महिलेला धक्का लागल्याने गोवा एक्स्प्रेसमध्ये गोंधळ; गोव्यातील प्रवासी बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 16:03 IST2026-02-04T16:02:48+5:302026-02-04T16:03:15+5:30
मिरज : एका महिलेला धक्का लागल्याच्या कारणामुळे गोवा एक्स्प्रेसमधून सातारा रेल्वेस्थानकात उतरविण्यात आलेला एक प्रवासी बेपत्ता झाला आहे. यासंबंधी ...

महिलेला धक्का लागल्याने गोवा एक्स्प्रेसमध्ये गोंधळ; गोव्यातील प्रवासी बेपत्ता
मिरज : एका महिलेला धक्का लागल्याच्या कारणामुळे गोवा एक्स्प्रेसमधून सातारा रेल्वेस्थानकात उतरविण्यात आलेला एक प्रवासी बेपत्ता झाला आहे. यासंबंधी मिरज रेल्वे पोलिस ठाण्यात प्रवासी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सागर नवसो सावंत (वय ४६, राहणार गोवा) हे दोन मित्रांसोबत शिर्डी येथे दर्शनासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात तिघेही कोपरगाव येथून गोवा एक्स्प्रेसने गोव्याला जात होते. प्रवासादरम्यान सागर आणि त्याच्या मित्रांनी मद्य प्राशन केले होते. २८ तारखेला मध्यरात्री सुमारे ३ वाजता गाडी सातारा रेल्वेस्थानकात येण्यापूर्वी आरक्षित डब्यात सागरचा एका महिला प्रवाशाला धक्का लागल्याने गोंधळ उडाला. त्यावर महिलांनी रेल्वे सुरक्षा दलाकडे तक्रार केली.
रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी सागर सावंत यांना सातारा रेल्वेस्थानकात गाडीतून उतरवले. मात्र, कोणीही सागरच्या विरोधात तक्रार न दिल्याने, त्यांना त्याच गाडीत जनरल बोगीत बसवून पुढील प्रवासासाठी पाठवले. सागरचे दोन मित्र गोव्यात पोहोचले, मात्र सागर सावंत गोव्यात पोहोचलाच नाही.
ते वास्को येथील घरातही न पोहोचल्याने आणि त्यांचा मोबाईल बंद असल्याने सावंत कुटुंबीयांनी सातारा रेल्वे पोलीस दूरक्षेत्रात सागर बेपत्ता असल्याची तक्रार दिली. मिरज रेल्वे पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक राजू कर्नाळकर बेपत्ता सागर सावंत यांचा शोध घेत आहेत.