Sangli Politics: जयंत पाटीलविरोधी एकत्र गटासाठी चेंडू मुख्यमंत्र्यांकडे, विकास आघाडीचे जुळता-जुळेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 20:24 IST2025-11-10T20:21:48+5:302025-11-10T20:24:01+5:30
Local Body Election: बंडोबांचे पेव फुटणार, मतदारांना सुगीचे दिवस

Sangli Politics: जयंत पाटीलविरोधी एकत्र गटासाठी चेंडू मुख्यमंत्र्यांकडे, विकास आघाडीचे जुळता-जुळेना
अशोक पाटील
ईश्वरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे उरूण - ईश्वरपूर नगरपालिकेच्या रणांगणात जय्यत तयारीने आपला फौजफाटा उतरवण्याच्या प्रयत्नात आहेत. याउलट विरोधी गटात आजही जुळता जुळेना, अशी स्थिती आहे. त्यामुळे विकास आघाडीच्या निर्णयाचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात जाण्याची शक्यता आहे. तत्पूर्वीच नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे यांनी आपली प्रचार यंत्रणा राबविण्यास सुरुवात केली आहे.
जयंत पाटील यांनी नगराध्यक्ष पदासाठी आनंदराव मलगुंडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे, तर १५ प्रभागांतील आपले उमेदवारही निश्चित केल्याचे समजते. विरोधातील भाजप, शिंदेसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यामध्ये उमेदवार निश्चित करण्यासाठी जुळता जुळेना, असे चित्र आहे. यावर विस्कळीत स्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच तोडगा काढतील, अशी चर्चा विरोधी गटात सुरू आहे. विविध प्रभागांतील जागा वाटपावरून विकास आघाडीमध्ये एकमत नसल्याने काही इच्छुक उमेदवारांनी आपल्या पातळीवर प्रचारही सुरू केला आहे.
विकास आघाडीची मोट बांधण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, राहुल महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांना एकत्र करावे लागणार आहे. त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वेळोवेळी प्रयत्न केले. तरीही त्यांच्यात जागा वाटपावरून मतभेद कायम आहेत. त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते विक्रम पाटील यांची विचारसरणी वेगळ्या दिशेने विचार करत आहे. त्यामुळेच जयंत पाटील विरोधी गटाची मोट बांधण्यासाठी मुख्यमंत्री स्वत: सरसावणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
मतदारांना सुगीचे दिवस
शहरातील प्रभाग १, ५, ६ मध्ये इच्छुकांची संख्या पाहता विकास आघाडीतील नेत्यांपुढे मोठे आव्हान उभे आहे. जयंत पाटील गटात उमेदवारी मिळवण्यासाठी शक्ती प्रदर्शन केले जात आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीच्या रणांगणात बंडोबांचे पेव फुटणार आहे. या स्थितीत मतदारांना सुगीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत.