Sangli: दिवाळी सुटीत लुटा जंगल सफारीचा मनमुराद आनंद, चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी खुले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 13:29 IST2025-10-18T13:28:44+5:302025-10-18T13:29:11+5:30
वारणावती : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यान व निसर्ग पर्यटन केंद्र पावसाळ्यामुळे दरवर्षीप्रमाणे बंद ठेवण्यात येते. १५ जूनपासून ...

Sangli: दिवाळी सुटीत लुटा जंगल सफारीचा मनमुराद आनंद, चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी खुले
वारणावती : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यान व निसर्ग पर्यटन केंद्र पावसाळ्यामुळे दरवर्षीप्रमाणे बंद ठेवण्यात येते. १५ जूनपासून पर्यटनासाठी बंद असणारे अभायारण्य बुधवारपासून पर्यटकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे.
दरवर्षी दि. १५ जून ते दि. १५ ऑक्टोबर या कालावधित अतिवृष्टीमुळे पर्यटन सेवा थांबविली जाते. सध्या निसर्ग पर्यटन सुरू करण्यात आले असून, यामुळे पर्यटकांना जंगल सफारीचा मनमुराद आनंद घेता येणार आहे. मात्र, प्रत्येक आठवड्यातील गुरुवारी पर्यटन बंद राहणार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.
पर्यटकांसाठी जाधववाडी गेट क्र. १ येथे पर्यटन पास आणि बससेवेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुकांनी येथे नोंदणी करून जंगल सफारीसाठी पास घ्यावेत आणि अधिकृत प्रवेश करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखला जातो.
येथे विविध प्रकारची फुलपाखरे, पक्षी, दुर्मिळ वनस्पतींसोबतच बिबट्या, अस्वल, सांबर, भेकर, गवा, शेखरू यांसारख्या वन्यप्राण्यांचे सहज दर्शन होते. पर्यटकांनी निसर्गाचे भान ठेवून, वनविभागाने घालून दिलेले नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहन वनविभागाच्या पर्यटन विभागातर्फे करण्यात आले आहे.