Sangli: चांदोली ५८ टक्के भरले; कोकरूड-रेठरे बंधारा अद्याप पाण्याखाली, चार गावांचा संपर्क तुटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 19:17 IST2025-06-24T19:16:44+5:302025-06-24T19:17:10+5:30
तालुक्यातील सहा मोठे प्रकल्प तसेच ४९ पैकी २१ पाझर तलाव भरले

Sangli: चांदोली ५८ टक्के भरले; कोकरूड-रेठरे बंधारा अद्याप पाण्याखाली, चार गावांचा संपर्क तुटला
शिराळा : शिराळा शहरास तालुक्यात पावसाच्या लहान-मोठ्या सरी सुरूच आहेत. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात तसेच धरण परिसरात अतिवृष्टी सुरू असल्याने चांदोली धरण ५८ टक्के भरले आहे. तालुक्यातील सहा मोठे प्रकल्प तसेच ४९ पैकी २१ पाझर तलाव भरले आहेत. तर २८ पाझर तलावांत ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. कोकरूड-रेठरे बंधारा अद्याप पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे चार गावांचा संपर्क तुटला आहे.
पावसामुळे वाकुर्डे बुद्रुक येथील करमजाई तलाव, अंत्री बुद्रुक तलाव, रेठरे धरण, मोरणा धरण, टाकवे तलाव, शिवणी तलाव भरले आहेत. गिरजवडे धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने पाणीसाठा स्थिर आहे. सततच्या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील निवळे, पाथरपुंज, चांदोली येथे दमदार पाऊस सुरू असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. गतवर्षी १०.५० टीएमसी पाणीसाठा होता. तर यावर्षी १९.९८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. चांदोली धरणात ६ हजार १६१ क्युसेकने आवक, तर वीज निर्मिती केंद्रातून १७२५ क्यूसेकने नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. दि. २३ मेपासून आजअखेर ६.५७ टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
शिराळा परिसरातील तलाव व धरणातील पाणीसाठा व कंसात गतवर्षीचा पाणीसाठा
मोरणा धरण - १००%
करमजाई तलाव- १००%
मानकरवाडी तलाव - १००%
शिवणी तलाव - १००%
टाकवे तलाव - १००%
रेठरे धरण - १००%
कार्वे तलाव - ३३%
गिरजवडे मध्यम प्रकल्प - ७२%
चांदोली धरण - ५८.०८%
मंडलनिहाय पडलेला पाऊस कंसात एकूण पाऊस मिली मीटर मध्ये असा..
कोकरूड १५.५०(३३०.३० )
शिराळा (१९९.८०)
शिरशी ८.५० (२७८.३०)
मांगले ७.३० (१९६.९० )
सागाव ८.८० (१९३.००)
चरण २८ (४९९.८० )
वारणावती - २९ (६५३.००)