चोरट्यांचे धाडस वाढले; सांगली जिल्ह्यात भिंतीला भगदाड पाडून चोरी करणारी टोळी, पोलिसांसमोर आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 17:29 IST2025-12-15T17:29:31+5:302025-12-15T17:29:51+5:30
भिंत चक्क ‘ब्रेकर’ने फोडून चोरट्यांनी सोन्या, चांदीचे दागिने लंपास केले

चोरट्यांचे धाडस वाढले; सांगली जिल्ह्यात भिंतीला भगदाड पाडून चोरी करणारी टोळी, पोलिसांसमोर आव्हान
सांगली : दरवाजाचा कडी-कोयंडा किंवा शटर उचकटून चोरी न करता थेट भिंतीला भगदाड पाडून चोरी करण्याची नवी ‘मोडस’ पोलिसांना डोकेदुखी ठरत आहेत. त्याचबरोबर चोरी झाल्यानंतर संबंधित मालकाला मोठा फटका बसत आहे. गेल्या काही वर्षांत चक्क भिंतीला भगदाड पाडून चोरी करणाऱ्या टोळ्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.
आतापर्यंत दुकानाचे शटर उचकटून किंवा घर, फ्लॅट, बंगले यांचे कडी-कोयंडे तोडून चोरटे चोरी करत होते. परंतु, आता धाडसी चोरी करण्याची पद्धत देखील चोरटे वापरत आहेत. ताकारी (ता. वाळवा) येथील महालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानाची मागील बाजूची भिंत चक्क ‘ब्रेकर’ने फोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून ९ लाख ३४ हजारांचे सोन्या, चांदीचे दागिने लंपास केल्याचा प्रकार घडला.
सकाळी दुकान उघडल्यानंतर आतमध्ये भगदाड पडल्याचे दिसताच धक्काच बसला. तसेच, परिसरातून देखील या धाडसी चोरीबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच ब्रेकरने भिंत फोडण्यासाठी त्यांनी शेजारच्या विद्युत पेटीला वायर जोडून वीज घेतल्याचेही स्पष्ट झाले.
पाच वर्षांपूर्वी दिघंची (ता. आटपाडी) येथील सराफी दुकानाच्या पाठीमागील भिंतीला भगदाड पाडून १८ लाखांचे दागिने चोरल्याचा प्रकार घडला होता. पुन्हा एकदा असाच प्रकार घडल्यामुळे सराफ दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सांगलीत काही दिवसांपूर्वी मोबाइल शॉपीला पाठीमागून भगदाड पाडून आतमध्ये प्रवेश करून लाखो रुपयांचे मोबाइल चोरून नेल्याचा प्रकार घडला होता. तसेच, भिंतीला भगदाड पाडून चोरीचाही प्रकार सांगली परिसरात घडला.
दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करण्यापेक्षा चक्क भिंतीला भगदाड पाडून चोरी करणाऱ्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. अलीकडे बरेचजण चोरी होऊ नये म्हणून दरवाजाला सेंटर लॉक, मजबूत कडी-कोयंडे बसवत आहेत. परंतु, चोरट्यांनी थेट भिंतीला भगदाड पाडून चोरी केल्यामुळे आणखी कोणती सुरक्षा यंत्रणा बसवायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चोरट्यांचे धाडस वाढले
अलीकडे मजबूत कडी-कोयंडे, सेंटर लॉक तोडूनही चोरटे चोरी करत असल्यामुळे मौल्यवान वस्तूंची सुरक्षा कशी करायची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता थेट ब्रेकरने भिंतीला भगदाड पाडून चोरी केली जात असल्यामुळे चोरट्यांचे धाडस वाढल्याचे दिसून येत आहे.