अंधश्रद्धेचा प्रसार, सांगलीत पॉल दिनाकरनसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 18:28 IST2026-03-16T18:28:14+5:302026-03-16T18:28:30+5:30

सर्किट बेंचसमोर सुनावणी

Case registered against six people including Paul Dinakaran in Sangli for spreading superstition | अंधश्रद्धेचा प्रसार, सांगलीत पॉल दिनाकरनसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अंधश्रद्धेचा प्रसार, सांगलीत पॉल दिनाकरनसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सांगली : कवलापूर येथील विमानतळाच्या जागेवर आयोजित ख्रिश्चन प्रार्थना सभेमध्ये अटी-शर्तीचा भंग करून अंधश्रद्धेचा प्रचार-प्रसार केल्याबद्दल सांगली ग्रामीण पोलिसांनी व्हिडिओ शूटिंगच्या आधारे चौघांवर गुन्हा दाखल केला. संशयित दिलीप सुधाकर भोरे (रा. विश्रामबाग), रावसाहेब वसंत वाघमारे (रा. सातारा), वक्ते डॉ. पॉल दिनाकरण, सॅम्युअल दिनाकरण (दोघे रा. चेन्नई, तामिळनाडू), सुजी (रा. मुंबई) व अनोळखी एक, अशी संशयितांची नावे आहेत.

कवलापूर येथे दि. १३ ते १५ मार्चअखेर ख्रिश्चन प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. डॉ. पॉल दिनाकरण हे वक्ते म्हणून उपस्थित होते. या सभेपूर्वी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार नितीन शिंदे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिस प्रशासनाकडे तक्रार केली होती. पॉल दिनाकरण हे वेगवेगळे चमत्कारिक दावे करत असल्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाची परवानगी रद्द करावी, अशी मागणी केली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील पोलिसांकडे तक्रार केली होती. कार्यक्रमाचे चित्रीकरण करून अंधश्रद्धा पसरवणारे दावे केल्यास कारवाईची मागणी केली होती.

दरम्यान, सांगली ग्रामीण पोलिसांनी दि. १३ रोजी पहिल्या दिवशी प्रार्थना सभेचे चित्रीकरण केले. होप ऑफ ग्लोरी मिनिस्ट्री यांच्यावतीने महाराष्ट्र प्रेयर फेस्टिव्हल या कार्यक्रमात संशयित दिलीप भोरे, रावसाहेब वाघमारे, डॉ. पॉल दिनाकरण, सॅम्युअल दिनाकरण यांनी कार्यक्रमासाठी दिलेल्या अटी-शर्तीचे पालन केले नाही. कार्यक्रमाच्या ठिकाणी एक अनोळखी पुरुष व सुजी नावाच्या महिलेला लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरेल, असे वक्तव्य करण्यास चिथावणी दिली. 

त्यामुळे या दोघांनी डॉ. पाल अंकल आणि इवांजेलीन आन्टी या दोघांनी तिला ‘ले हँड प्रे’ केल्यामुळे तिचा रक्ताचा आजार कमी झाल्याचे सांगितले. तसेच ‘ले हँड प्रे’ केल्यामुळे पदवी परीक्षेला ९९ टक्के गुण मिळाल्याचे सांगून अंधश्रद्धेचा प्रचार व प्रसार केल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांतर्फे कर्मचारी यासीन फकीर यांनी फिर्याद दिली. त्यानुसार सहा जणांविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक भैरू तळेकर तपास करीत आहेत.

सर्किट बेंचसमोर सुनावणी

पोलिसांनी पहिल्या दिवसातील कार्यक्रमाच्या चित्रीकरणानंतर दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीची परवानगी नाकारली. त्यामुळे ख्रिश्चन समाजातर्फे कोल्हापूर येथे सर्किट बेंचसमोर याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी होऊन अटी-शर्तीचे पालन करण्यास सांगून पुन्हा परवानगी दिली.

Web Title : अंधविश्वास फैला: सांगली में पॉल दिनाकरन समेत छह के खिलाफ मामला दर्ज

Web Summary : सांगली पुलिस ने ईसाई प्रार्थना सभा में अंधविश्वास फैलाने के आरोप में पॉल दिनाकरन और अन्य के खिलाफ मामला दर्ज किया। उन्होंने शर्तों का उल्लंघन किया, चमत्कारी दावे किए और आस्था उपचार के बारे में भ्रामक जानकारी फैलाई, जिसके कारण अंधविश्वास विरोधी कानूनों के तहत आरोप लगाए गए।

Web Title : Superstition Spreads: Case Filed Against Paul Dinakaran in Sangli

Web Summary : Sangli police filed a case against Paul Dinakaran and others for promoting superstition at a Christian prayer meeting. They violated terms, making miraculous claims and spreading misleading information about faith healings, leading to charges under anti-superstition laws.