सांगली जिल्ह्यात ऊस दर जाहीर न करणाऱ्या कारखान्यांच्या गाड्या पेटवणार, महेश खराडेंनी दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 13:25 IST2025-11-13T13:23:50+5:302025-11-13T13:25:10+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना जमते तर तुम्हाला का नाही? : पोपट मोरे

संग्रहित छाया
सांगली : जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी ३,५०० रुपये दर जाहीर केला असून, हा निर्णय संघटनेच्या आंदोलनामुळे झाला आहे. उर्वरित साखर कारखान्यांनी तत्काळ दर जाहीर करावा, अन्यथा संघर्ष अटळ आहे. गाड्या अडवू, पेटवू आणि कारखाने बंद पाडू, असा इशारा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर करण्यासाठी १२ नोव्हेंबरची मुदत मागितली होती, जी बुधवारी संपली आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा, जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, संजय बेले, भागवत जाधव, बाबा सांद्रे, भरत चौगुले आदी उपस्थित होते.
महेश खराडे म्हणाले, ७ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत कारखानदारांनी १२ नोव्हेंबर रोजी दर जाहीर करण्याचा आश्वासन दिले होते. त्यानुसार क्रांती कारखान्याने ३,५०० रुपये जाहीर केले, जे आमच्या मागणीप्रमाणे एफआरपी पेक्षा १३३ रुपये जास्त आहेत. त्यांचे अभिनंदन करतो. सोनहिरा कारखान्याने एफआरपी पेक्षा ३३ रुपये जास्त म्हणजे ३,५०० रुपये दर जाहीर केला आहे; त्यांनी आणखी ६७ रुपये देण्याची गरज आहे.
दालमिया कारखान्याने त्याच्या एफआरपी एवढाच ३,५३७ रुपये दर जाहीर केला आहे; त्यामुळे त्यांना आणखी १०० रुपये शेतकऱ्यांना दिले पाहिजेत. तसेच उर्वरित सर्व कारखान्यांनी रात्री १२ वाजेपर्यंत दर जाहीर करावेत, अन्यथा संघर्ष अटळ आहे. आमच्या मागणीप्रमाणे दर जाहीर करावे; अन्यथा गाड्या अडवू, पेटवू आणि कारखाने बंद पाडू, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी रावसाहेब पाटील, बाळासाहेब जाधव, प्रताप पाटील, सुधाकर पाटील आणि रावसाहेब पाटील आदी उपस्थित होते.
दराची लढाई आणखी तीव्र करू : संदीप राजोबा
संदीप राजोबा म्हणाले, कारखान्यांनी आपले शब्द पाळले नाहीत. त्यांनी रात्री १२ वाजेपर्यंत दर जाहीर करावेत. आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत. ऊस दराची लढाई आम्ही आणखी तीव्र करू. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे आणि तो अधिक तीव्र ठेवू.
कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना जमते तर तुम्हाला का नाही? : पोपट मोरे
पोपट मोरे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने एफआरपीच्या जादा दर देऊ शकतात. क्रांती साखर कारखान्यांनीही एफआरपीपेक्षा जादा दर दिला आहे. जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी त्याहून अधिक दर देणे आवश्यक आहे. कारखानदारांनी मुदत मागितली असूनही वेळेवर दर जाहीर केले नाहीत. शेतकऱ्यांची चेष्टा सुरू केली आहे. या कारखान्याच्या ऊस तोडी बंद पाडणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.