Sangli: तासगावजवळ मोटारीची दुचाकीला धडक; चिमुकल्यासह तिघे ठार, चौघेजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 14:26 IST2025-09-10T14:25:50+5:302025-09-10T14:26:23+5:30
तासगाव भिलवडी मागावर चारचाकी व दुचाकीचा भीषण अपघात होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.

Sangli: तासगावजवळ मोटारीची दुचाकीला धडक; चिमुकल्यासह तिघे ठार, चौघेजण जखमी
तासगाव : तासगाव-भिलवडी मार्गावर मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास चारचाकी व दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीवरील वृद्ध दाम्पत्य आणि त्यांचा पाच वर्षांचा नातू असा तिघांचा मृत्यू झाला. चारचाकीमधील चाैघेजण जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये शिवाजी बापू सुतार (५७), आशाताई शिवाजी सुतार (५५) आणि वैष्णव ईश्वर सुतार (५ वर्षे, रा. बुर्ली, ता. पलूस) यांचा समावेश आहे. चारचाकीचा चालक सूरज बलराम पवार (रा. तानाजी चौक, मिरज) तसेच किशोर लक्ष्मण माळी (रा. कवलापूर), स्वाती अमित कोळी (रा. सांगलीवाडी), पूजा राघवेंद्र कुलकर्णी (रा. सांगली) हे चौघेजण गंभीर जखमी झाले.
मृत तिघे काकडवाडी येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी गेले होते. नातेवाइकांना भेटून माघारी घरी निघाले होते. चारचाकीमधील चौघेजण सांगलीतील एका शिक्षण संस्थेत शिक्षक असून, ते कडेपूर येथे झालेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यास गेले होते. त्यातील स्वाती अमित कोळी (रा. सांगलीवाडी) यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला होता. कार्यक्रम आटोपून सांगलीकडे परत येत असताना त्यांची दुचाकीसोबत भीषण धडक झाली. धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्याकडेला सुमारे २० फूट अंतरावर द्राक्षबागेत जाऊन पडली.
अपघात इतका भीषण होता की, दुचाकी चक्काचूर झाली होती. गाडी चालवणाऱ्या शिवाजी सुतार यांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेली त्यांची पत्नी आणि नातू यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले होते. पण, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचाही मृत्यू झाला. चारचाकीचाही चुराडा झाला. जखमींमध्ये पूजा राघवेंद्र कुलकर्णी, सूरज पवार, स्वाती अमित कोळी व अन्य एकाचा समावेश असून, त्यांच्यावर तासगाव व सांगली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बुर्ली गावावर शोककळा
अपघाताची माहिती मिळताच तासगाव शहरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. पोलिसांना तसेच रुग्णवाहिकेस बोलावण्यात आले. अपघातानंतर घटनास्थळावर मोठी गर्दी झाली होती. या अपघातात दाम्पत्यासह नातवाचा मृत्यू झाल्याने बुर्ली गावावर शोककळा पसरली होती.