गाडी सांगलीत दारात अन् टोल मात्र इंदापुरातून कपात, एकदा नव्हेतर तिसऱ्यांदा प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 17:22 IST2025-12-29T17:21:46+5:302025-12-29T17:22:37+5:30
टोल कंपनीकडून टोलवाटाेलव

गाडी सांगलीत दारात अन् टोल मात्र इंदापुरातून कपात, एकदा नव्हेतर तिसऱ्यांदा प्रकार
सांगली : गाडी सांगलीतील वारणाली परिसरात दारात असताना पुणे-सोलापूर महामार्गावरील सरडेवाडी टोलनाका आणि इंदापूर-अकलूज महामार्गावरील बावडा टोलनाका येथून गाडी गेल्याचे भासवून टोलची रक्कम बँक खात्यातून कपात केल्याचा प्रकार घडला. तक्रारीनंतर पडताळणी करताच प्रत्यक्षात दोन्ही गाड्या वेगवेगळ्या कंपनीच्या असून, नंबर एकच असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, ‘फास्टटॅग’ सांगलीतील गाडीवर असताना टोलची रक्कम कशी कपात झाली याबाबत टोल वसूल करणाऱ्या कंपनीकडून टोलवाटोलव सुरू आहे.
सांगलीतील रंग उत्पादक करणारे उद्योजक अरुण कुलकर्णी यांना एकदा नव्हे तर तिसऱ्यांदा त्यांची गाडी सांगलीत घरासमोर असताना त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या फास्टटॅगमधून टोलची रक्कम वजा झाल्याचा अनुभव आला आहे. गतवर्षी २ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांची गाडी घराच्या पार्किंगमध्ये असतानाही फास्टटॅगमधून टोलची रक्कम वजा झाली. कुलकर्णी यांनी पुरावे सादर केल्यानंतर एचडीएफसी बँकेने रक्कम परत केली. तब्बल एक वर्षानंतर पुन्हा फास्टटॅगमधून पैसे वजा झाले आहेत. दि. ९ डिसेंबर २०२५ रोजी इंदापूर-अकलूज महामार्गावरील बावडा टोलनाका येथून दुपारी एक वाजता कुलकर्णी यांची गाडी गेल्यामुळे टोल कपात केल्याचा संदेश आला.
प्रत्यक्षात कुलकर्णी यांची गाडी (एमएच १२ क्यूएफ ०२१६) ही सांगलीत घरासमोर होती. परंतु, त्यांच्याच नंबर प्लेटचा वापर करून प्रत्यक्षात दुसरीच गाडी बावडा टोलनाक्यावरून गेली.
दि. ९ रोजी हा प्रकार घडल्यानंतर पुन्हा २७ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ११ वाजता कुलकर्णी यांना त्यांची गाडी पुणे-सोलापूर महामार्गावरील सरडेवाडी टोलनाक्यावरून गेल्यामुळे टोलची रक्कम कपात झाल्याचा संदेश आला. या दिवशीही त्यांच्याच नंबर प्लेटचा वापर करून प्रत्यक्षात दुसरीच गाडी टोलनाक्यावरून गेली होती.
कुलकर्णी यांनी टोल फ्री क्रमांकावरून संपर्क साधल्यानंतर संबंधित टोलनाक्यावरून या प्रकाराबाबत टोलवाटोलव करण्यात आली. कुलकर्णी यांनी तक्रार करणार असल्याचे सांगताच चूक झाल्याचे मान्य करून टोलची रक्कम परत करण्यात आली. परंतु, प्रत्यक्षात सांगलीत गाडी असताना त्याच गाडीची नंबरप्लेट वापरून रक्कम कशी कपात झाली? याबाबत कंपनीकडून उत्तर मात्र देण्यात आले नाही.
बनावट नंबर प्लेटमुळे पैसे कपात झाले
कुलकर्णी यांची गाडी सांगलीत असताना त्यांच्याच गाडीची नंबर प्लेट वापरून दुसरीच गाडी टोलनाक्यावरून गेल्याचे स्पष्ट झाले. परंतु, फास्टटॅग सांगलीतील गाडीवर असताना रक्कम पुण्याजवळील टोलनाक्यावर कशी कपात झाली? याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. बनावट नंबरप्लेट वापरणे आणि परस्पर टोलची रक्कम कपात होण्याचा गुन्हा या प्रकरणात घडला आहे.
फास्टटॅग प्रणाली सुरक्षित आहे काय?
जर एकाच नागरिकाकडून तिसऱ्यांदा परस्पर टोलची रक्कम परस्पर कपात केल्याचा प्रकार घडत असेल तर ‘फास्टटॅग’ प्रणाली सुरक्षित आहे काय ? ‘डिजिटल इंडिया’ची यशस्वी योजना की केवळ जबाबदारी झटकण्याचे साधन? प्रत्येकवेळी ग्राहकानेच सावध होऊन तक्रार करायची, पुरावे द्यायचे, मग यंत्रणा नेमकी काय करते? असा सवाल कुलकर्णी यांनी केला आहे.
गुन्हा दाखल होणार काय?
बनावट नंबर प्लेट, फास्टटॅगमधून परस्पर रक्कम कपातीचा गुन्हा उघडकीस येऊनही कारवाई झाली नाही? भविष्यात बनावट नंबर प्लेट वापरणाऱ्या गाडीच्या चालकाने गुन्हा केला किंवा अपघात केला तर त्याची जबाबदारी कोणाची? टोलची रक्कम परत करून ही जबाबदारी संपणार नाही. त्यामुळे यामध्ये दोषी असणाऱ्या सर्वांवर कारवाई करावी, अशीही मागणी कुलकर्णी यांनी केली.