गोपीचंद पडळकरांची आमदारकी रद्द करा, सांगलीतील ख्रिस्ती समाजातर्फे मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 16:40 IST2025-06-27T16:39:48+5:302025-06-27T16:40:56+5:30

चार तास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारला होता

Cancel Gopichand Padalkar's MLA status, demand from Christian community in Sangli | गोपीचंद पडळकरांची आमदारकी रद्द करा, सांगलीतील ख्रिस्ती समाजातर्फे मागणी 

गोपीचंद पडळकरांची आमदारकी रद्द करा, सांगलीतील ख्रिस्ती समाजातर्फे मागणी 

सांगली : भाजपचे आमदारगोपीचंद पडळकर यांनी खिश्चन धर्मगुरू पास्टर व सेवक यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी जिल्ह्यातील ख्रिस्ती समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. तसेच पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली. पडळकर आणि शासनाच्या निषेधाच्या आंदोलकांनी जोरदार घोषणा दिल्या.

ख्रिस्ती समाजाचे मार्गदर्शक राम कांबळे, सॅम्सन तिवडे, गॅब्रिएल तिवडे, आकाश तिवडे, किरण आरवाट्टगी, मनोज रणधीर, विजय बनकरी, दादासाहेब कस्तुरे, विशाल कांबळे, विकास मगदूम, पॉल करा, पॉल चॉको, राजू होळकर, राजू कांबळे, प्रकाश तिवडे, अजित कदम, आदींच्या नेतृत्वाखाली हजारो समाज बांधवांनी पावसात मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन दिले. चार तास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारला होता.

निवेदनात म्हटले की, दि. ६ जूनला आमची बहीण रुतुजा राजगे यांनी आत्महत्या केली. या घटनेचा तपास पोलिस करीत आहेत. पण, आमदार गोपीचंद पडळकर यांनी या घटनेचा फायदा घेऊन समाजामध्ये अशांतता, दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने दि. १७ जूनला सांगलीमधील राममंदिर चौकात सभा घेऊन प्रसार माध्यमातून भाषणात ख्रिस्ती पादरी (धर्मगुरू) त्यांचा सैराट करा, त्याची जबाबदारी मी स्वीकारतो, असे म्हटले आहे. याप्रकरणी पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे, अशी आक्रमक मागणी ख्रिस्ती समाजाने केली.

आंदोलकांच्या मागण्या

  • गोपीचंद पडळकर यांच्यावर ताबडतोब गुन्हे दाखल करून आमदारकी रद्द झालीच पाहिजे.
  • महाराष्ट्रातील सर्व ख्रिस्ती धर्मगुरू व त्यांचे कुटुंब यांना संरक्षण मिळावे
  • महाराष्ट्रातील सर्व उपासना मंदिर (चर्च)ला संरक्षण द्या
  • ऋतुजा राजगे यांच्या आत्महत्येची सी.बी.आय.मार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करा

Web Title: Cancel Gopichand Padalkar's MLA status, demand from Christian community in Sangli