सांगली महापालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्याचा बंगला फोडला, पंधरा तोळे सोन्यासह रोकड लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 18:12 IST2025-10-29T18:12:39+5:302025-10-29T18:12:49+5:30
परिसरात सीसीटीव्ही नाही

छाया-सुरेंद्र दुपटे
सांगली : शहरातील अभयनगर परिसरातील माळी वस्तीत महापालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्याचा बंद बंगला फोडून चोरट्याने पंधरा तोळे सोन्याचे दागिने व ३० हजारांची रोकड, असा मुद्देमाल लंपास केला. संपूर्ण कुटुंब दिवाळीनंतर सहलीला गेले असताना चोरट्याने डाव साधला. संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. या घरफोडीची पोलिसांत नोंद झाली आहे.
याबाबत महापालिकेचे निवृत्त कर्मचारी दादासाहेब भीमराव सावळजकर यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दादासाहेब सावळजकर हे महापालिकेतील पाणीपुरवठा विभागात कार्यरत होते. ते निवृत्त झाले आहेत. अभयनगर येथील माळी वस्तीत गल्ली क्रमांक-१ मध्ये त्यांचा बंगला आहे. दिवाळीनंतर ते कुटुंबीयांसह म्हैसूर उटीच्या सहलीस गेले होते.
चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातील पंधरा तोळ्याचे दागिने आणि तीस हजारांची रोकड लंपास केली. कपाट फोडण्यासाठी चोरट्याने घरातील कुदळीचा वापर केला. चोरट्याने मुख्य दरवाजाला आतून कडी घातली. त्यानंतर स्वयंपाकघरातील दरवाजातून तो बाहेर पडला.
सावळजकर कुटुंबीय मंगळवारी सायंकाळी घरी परतले. त्यांना दरवाजाचा कडीकोयंडा उचकटलेला दिसला. बंगल्यात प्रवेश करताच कपाटातील दागिने चोरीला गेल्याचे कळले. त्यांनी तातडीने संजयनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. सहायक पोलिस निरीक्षक किरण स्वामी, पोलिस हवालदार असीफ सनदी, सुदर्शन खोत, सूरज मुजावर, अनिकेत शेटे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. भरवस्तीत झालेल्या चोरीने परिसरात खळबळ उडाली. घटनास्थळी श्वान पथकासह ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.
परिसरात सीसीटीव्ही नाही
माळी वस्ती परिसरात सावळजकर यांच्या बंगल्याशेजारी अनेक बंगले आहेत. नागरी वस्तीही दाटीवाटीची आहे. तरीही या भागात एकही सीसीटीव्ही नव्हता. विशेष म्हणजे शेजारी भिंतीला भिंत लागून घर असूनही त्यांना चोरी झाल्याचे समजले नाही. सराईत चोरट्यानेच ही चोरी केल्याचा अंदाज असून, पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू आहे.