शंभर तोळे सोने आण, मगच नवऱ्यावर हक्क सांग!; सांगलीच्या माहेरवाशिणीचा छळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 13:33 IST2025-08-13T13:33:19+5:302025-08-13T13:33:57+5:30
पुण्यातील कुटुंबावर गुन्हा

संग्रहित छाया
सांगली : ‘शंभर तोळे सोने आण आणि मगच नवऱ्यावर हक्क सांग,’ असे सांगत छळ केल्याची फिर्याद सांगलीतील माहेरवाशिणीने पोलिसांत दिली. त्यानंतर सासरच्या नातेवाइकांविरोधात सांगली शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व नातेवाइक पुण्यातील कोथरूड येथील राहणारे आहेत.
स्नेहल रोहन उभे (वय ३०, रा. वेंकटेशनगर, सांगली) या पीडित विवाहितेने फिर्याद दिली. त्यानुसार सासू कुंदा बंडोपंत उभे, सासरा बंडोपंत निवृत्ती उभे, पती रोहन (सर्व रा. लक्ष्मी रेसीडेन्सी, गल्ली क्रमांक १०, डहाणूकर कॉलनी, कोथरूड, पुणे), नणंद ऐश्वर्या रूपेश वाघेरे व तिचा पती रूपेश (रा. वाघेरे कॉलनी, पिंपरी गाव, पिंपरी-चिंचवड, पुणे) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार सासरच्या सर्वांनी स्नेहल यांना ‘१०० तोळे हुंडा आणल्यानंतरच नवऱ्यावर हक्क सांग,’ असे धमकावत शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी दिली. शारीरिक व मानसिक छळ केला. १८ जुलै २०२१ ते २५ मार्च २५ या कालावधीत छळ झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. स्नेहल यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) ८५, ११५ (२), ३५१ (२), ३५२, ३ (५) नुसार गुन्हे दाखल केले.