जयंतरावांना खुजे करण्याचा भाजपचा डाव

By Admin | Updated: June 17, 2016 23:30 IST2016-06-17T23:03:38+5:302016-06-17T23:30:21+5:30

लॉटरीप्रकरणी राष्ट्रवादीचा पलटवार : वाळवा, शिराळा तालुक्यात तर्कवितर्क

BJP's decision to open Jayantrao | जयंतरावांना खुजे करण्याचा भाजपचा डाव

जयंतरावांना खुजे करण्याचा भाजपचा डाव

अशोक पाटील -- इस्लामपूर --युती शासनाने राज्याची तिजोरी मोकळी केल्याचा आरोप करत सत्तेवर आलेल्या आघाडी शासनाने अर्थखात्याची जबाबदारी जयंत पाटील यांच्यावर सोपवली होती. पाटील यांनी राज्याची तिजोरी भरण्यासाठी बाहेरील राज्यांतील लॉटरी आणि आॅनलाईन लॉटरीला परवानगी दिली. त्यातून सनदी अधिकाऱ्याने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. जयंतरावांचे नेतृत्व खुजे करण्यासाठी भाजपचा हा डाव असल्याचे त्यांचे जवळचे कार्यकर्ते बोलत आहेत.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अर्थखात्याची जबाबदारी जयंत पाटील यांच्यावर सोपविल्यानंतर त्यांनी ती समर्थपणे पेलली. शासनाचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध योजना अंमलात आणल्या. त्यामध्ये त्यांनी लॉटरी उद्योगाला पाठबळ दिले. बेकायदेशीर मटक्याच्या रूपाने शासनाचा कोट्यवधी रुपये कर बुडत होता. त्यामुळे त्याला पर्याय म्हणून बाहेरील राज्यांतील आॅनलाईन लॉटरीला परवानगी देण्यात आली. यामध्ये जयंत पाटील यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप तत्कालीन सनदी अधिकारी आनंद कुलकर्णी यांनी केला आहे. त्यामुळे राज्यासह सांगली जिल्ह्यात व वाळवा—शिराळा तालुक्यात चर्चा सुरू आहे.
सध्या आमदार जयंत पाटील कुटुंबियांसमवेत अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांच्या पश्चात तालुक्यात त्यांच्याविषयी राष्ट्रवादीतील काहीजण दबक्या आवाजात चर्चा करत आहेत, तर काहींना या प्रकरणाविषयी उत्सुकता लागून राहिली आहे.
केंद्रात व राज्यात भाजप सरकार आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीची सहकार, शैक्षणिक, औद्योगिक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर पकड आहे. त्यामुळे भाजप सरकारने राष्ट्रवादीतील प्रमुख मोहऱ्यांना लक्ष्य करण्याचा डाव आखला आहे.
प्रारंभीच्या टप्प्यात अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर शिवसेनेतून राष्ट्रवादीत दाखल झालेले छगन भुजबळ यांना तर त्यांनी तुरुंगात डांबले आहे. आता जयंत पाटील यांच्यावर लॉटरीप्रकरणी संशयाचे ढग निर्माण केल्याची चर्चा आहे.
या लॉटरीप्रकरणी पुढे काय होणार याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. खा. राजू शेट्टी हा मुद्दा कितपत उचलून धरतात याकडेही तालुक्याचे लक्ष लागले आहे.


राजू शेट्टींची मागणी जयंतरावांच्या विरोधातूनच
लोकसभा निवडणुकीत खा. राजू शेट्टी स्वत:च्या विरोधातील उमेदवारापेक्षा जयंत पाटील यांनाच विरोधक मानतात. त्यातच स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपच्या दारात जाऊन बसली आहे. त्यामुळे खा. राजू शेट्टी यांनी आगामी होणाऱ्या निवडणुका समोर ठेवून, लॉटरी प्रकरणात आ. जयंत पाटील यांच्या चौकशीची मागणी केली आहे.

Web Title: BJP's decision to open Jayantrao