भाजप जाळणार जातीयवाद, विकृतीचा रावण; सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 15:33 IST2025-09-26T15:32:44+5:302025-09-26T15:33:15+5:30
पडळकर, तुम्ही या वाळव्यात या कोण तुम्हाला अडवतो पाहतो - महाडिक

भाजप जाळणार जातीयवाद, विकृतीचा रावण; सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा
सांगली : भाजपने नेहमीच संयमाचे राजकारण केले. पण त्यांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका केली. आता भाजप कार्यकर्तेही अंगावर येतील, त्यांना शिंगावर घेणार आहेत. त्याची सुरुवात १ ऑक्टोबरला सांगलीतील इशारा सभेने होईल. जातीयवाद व विकृत मनोवृत्तीच्या रावणाचे दहन करू. शरद पवार यांच्यापासून सुप्रिया सुळे, मेटकरीपर्यंत ज्यांची जीभ घसरली त्यांची चित्रफीतही दाखवू, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सांगलीत दिला. त्यामुळे भाजप विरूद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यातील राजकारण आणखी तापणार आहे.
सांगलीत भाजप ग्रामीण जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार सुरेश खाडे, आ. गोपीचंद पडळकर, आ. सत्यजित देशमुख, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, माजी आमदार दिनकर पाटील, नीता केळकर, माजी महापौर संगीता खोत, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, राहुल महाडिक उपस्थित होते.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सांगलीतील महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाला आता भाजपकडून प्रत्युत्तर देणार असल्याची घोषणाच मंत्री पाटील यांनी केले. ते म्हणाले, खासदार सुप्रिया सुळे ‘एकादशीला मटण खायला आवडेल’, असं म्हणाल्या तेव्हा १८ लाख वारकऱ्यांची चेष्टा झाली नाही का? अमोल मेटकरी यांनी इस्लामपुरात बडबड केली. त्याची क्लिप फिरली तेव्हा तुम्ही टाळ्या वाजवत होते. तुम्ही मेटकरींचे कान धरले का? गोपीचंद पडळकर यांचे कान धरायला फडणवीस खंबीर आहेत.
कोविडच्या काळात पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली तेव्हा फडणवीस यांनी फोन करून शरद पवार यांच्यावर बोलायचे नाही, असं सुनावले होते. तुम्ही मात्र फडणवीस यांच्यावर सतत तोंडसुख घेता. त्यांनी काय घोडे मारले आहे? मराठा समाजाला आरक्षण दिले, धनगर समाजाला आदिवासीच्या सवलती दिल्या. २२ हजार गावांना जलयुक्त शिवारातून पाणी दिले. अटल सेतूसारखे पूल, पुणे, नागपुरात मेट्रो, शेतीमालाला भाव दिला, यात त्यांची चूक काय?. तुम्ही फडणवीस यांना घाबरता म्हणून एकत्र आला आहात. तुम्ही अंगावर आलाच आहात तर आम्ही शिंगावर घेऊ.
राज्यात जातीयवाद कुणी पेरला? छत्रपती संभाजी महाराज यांना राज्यसभेचे खासदार केले, तेव्हा शरद पवार म्हणाले, पेशवे ठरविणार का राजे?. तुम्ही ठरवायचे होते. तुम्हाला कोणी अडविले होते. भाजपने त्यांना खासदार तरी केले, तुम्ही आमदार तरी करायचे होते. संभाजी महाराज यांना भाजप कार्यालयात यायला न लावता राष्ट्रपती कोट्यातून खासदार केले. तुम्ही मात्र रोहित पवार, सुप्रिया सुळे यांनाच आमदारकी, खासदारकी देणार. शरद पवार यांनी पुण्यात पुणेरी पगडी घालण्यास नकार दिला. हा जातीयवाद कुणी पसविला? असा सवालही पालकमंत्री पाटील यांनी उपस्थित केला.
पडळकर, तुम्ही या वाळव्यात या कोण तुम्हाला अडवतो पाहतो - महाडिक
सम्राट महाडिक म्हणाले, गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यानंतर गुन्हेगार प्रवृत्तीची काही माणसं बडबडत आहेत. हातवारे करत आहेत. काहीजण रस्त्यावर फिरू देणार नाही म्हणताहेत, कुणाच्यात हिंमत आहे. पडळकर तुम्ही या वाळव्यात, मी तुम्हाला वाजत-गाजत नेतो. मिरज दंगल कुणामुळे घडली? कुणाचे रात्री फोन जात होते, हे सर्वांना माहिती आहे.
राजारामबापूंना नमस्कार, जयंतरावांवर टीका
गोपीचंद पडळकर काय बोलले, ते बघायला आम्ही समर्थ आहोत. पडळकर, तुम्ही फार गडबड करता. तुमचे रक्त गरम आहे. राजारामबापूंच्या पुतळ्याला नमस्कार करायचे आणि जयंतरावांवर बोलायचे. त्यांच्या आई-वडिलांवर बोलू नका, जयंतरावांच्या कारखान्याच्या भानगडी बाहेर काढा, असा सल्लाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पडळकर यांना दिला.