Sangli Politics: विशाल पाटील यांना भाजपकडून पुन्हा प्रवेशाच्या पायघड्या की राजकीय जाळे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 18:11 IST2026-03-03T18:04:34+5:302026-03-03T18:11:47+5:30
चंद्रकांतदादांना नकार देणारे विशाल पाटील विखे-पाटील यांची ऑफर स्वीकारणार का?

Sangli Politics: विशाल पाटील यांना भाजपकडून पुन्हा प्रवेशाच्या पायघड्या की राजकीय जाळे?
सांगली : जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा “आमंत्रणाची” राजकीय फटाकेबाजी रंगली आहे. लोकसभा निवडणुकीत पराभवाची सल मनात ठेवून भाजप नेत्यांनी आता अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्यावर पक्षप्रवेशाचे जाळे टाकण्याची मोहीमच हाती घेतल्याची चर्चा रंगू लागली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या वर्षी दोनदा भाजपत प्रवेश करण्याचे निमंत्रण दिले होते. चंद्रकांतदादांची विनंती न स्वीकारणारे विशाल पाटील यांच्यासाठी आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पायघड्या घातल्या आहेत. चंद्रकांतदादांना नकार देणारे खासदार पाटील विखे पाटील यांचे आमंत्रण स्वीकारणार का?, याकडे सांगलीच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.
यापूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या वर्षी अवघ्या दोन महिन्यांत दोनदा “कमळ” हाती घेण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र, चंद्रकांतदादांच्या आग्रहाला खासदार पाटील यांनी थंड प्रतिसाद दिल्याने भाजपच्या गोटात नाराजीची चर्चा सुरू झाली होती. आता त्याच धर्तीवर राधाकृष्ण विखे -पाटील यांनी जत तालुक्यातील म्हैसाळ विस्तारित बेळंकी (ता. मिरज) येथे या योजनेतील एक हजार ६०० मीटर लांबीच्या बोगद्याचा शेवटचा ब्लास्ट म्हणजेच ब्रेक थ्रू कार्यक्रमात विशाल पाटील यांना उघडपणे आमंत्रण देत राजकीय चर्चांना उधाण आणले.
कार्यक्रमाच्या मंचावरच विखे - पाटील यांनी भावनिक सूर लावत, “आपल्या सांगलीचे खासदार तरुण आहेत, आमचं पिढीजात नातं त्यांच्याशी आहे,” असे म्हणत जवळीक दाखवली. पण, पुढच्याच वाक्यात त्यांनी टोला हाणत, “या लोकांचे छक्के पंजे अजून तुम्हाला माहिती नाहीत,” असे सूचक विधान केले. ‘वसंतदादांचा विश्वासघात कोणी केला, हे लोकांना माहिती आहे,’ अशी आठवण करून देत त्यांनी राजकीय भूतकाळ उकरून काढला आणि अप्रत्यक्ष इशारा दिला.
विखे -पाटील यांनी एवढ्यावर न थांबता, “आज सगळा सांगली जिल्हा भाजपमय झाला आहे; विकासाच्या प्रवाहात सामील व्हा,” असे आवाहन विशाल पाटील यांना करत स्टेजवरील आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्याकडे साक्ष मागितली. “प्रवेशाबाबत निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात,” असे म्हणत त्यांनी दरवाजा उघडाच ठेवला.
मात्र, विशाल पाटील यांची भूमिका अद्यापही ‘नि:शब्द’ आहे. चंद्रकांत पाटील यांच्या दोन ऑफर नाकारल्यानंतर आता विखे- पाटील यांचे आमंत्रण ते स्वीकारणार का?, हा खरा प्रश्न आहे. सांगलीच्या राजकीय वर्तुळात मात्र चर्चा रंगली आहे हे आमंत्रण खऱ्या विकासासाठी आहे की पुढील निवडणुकांच्या गणितासाठी? कमळाचा गंध दरवळत असला, तरी विशाल पाटील यांच्या पुढच्या पावलाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सांगलीतला हा राजकीय सामना सध्या तरी आमंत्रण आणि प्रतिउत्तराच्या प्रतीक्षेतच रंगत आहे.
भाजपची लोकसभेची तयारी
लोकसभा पराभवानंतर सांगलीत पुन्हा पाय रोवण्यासाठी भाजपची ही रणनीती असू शकते. विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या यशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही कमळ फुलले आहे. अशा पार्श्वभूमीवर अपक्ष खासदाराला सोबत घेऊन ‘सांगली पूर्ण भाजपमय’ करण्याचा प्रयत्न भाजपच्या नेत्यांचा दिसत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. लोकसभा निवडणुका खूप दूर असल्या तरी आतापासूनच भाजप नेते तयारीला लागल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मी आहे तिथेच समाधानी : विशाल पाटील
भाजपमध्ये येण्याचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आमंत्रण दिले आहे. पण, मी अपक्ष म्हणून निवडून आलो असलो तरी काँग्रेसमध्ये सक्रिय आहे. काँग्रेस पक्षाचे सहयाेगी सदस्यत्व स्वीकारले आहे. पक्षामध्ये मी समाधानी असून माझी विकासकामेही होत आहेत. यामुळे भाजपमध्ये जाण्याचा काहीच संबंध नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे खासदार विशाल पाटील यांनी दिली.