सांगली काँग्रेस शहराध्यक्षांच्या संस्थेत भाजप नेत्यांची मांदियाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 16:54 IST2025-06-02T16:53:58+5:302025-06-02T16:54:34+5:30

महापालिका निवडणुकीत काय होणार?

BJP leaders throng Sangli Congress city president Prithviraj Patil recent program at his organization | सांगली काँग्रेस शहराध्यक्षांच्या संस्थेत भाजप नेत्यांची मांदियाळी

सांगली काँग्रेस शहराध्यक्षांच्या संस्थेत भाजप नेत्यांची मांदियाळी

सांगली : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना बंडखोरीचा मोठा फटका बसल्याने त्यांच्या समर्थकांनी पक्षीय कार्यक्रमांपासून दूर राहणे पसंत केले आहे. दुसरीकडे पृथ्वीराज पाटील यांचा भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट व शिंदेसेना या पक्षांच्या नेत्यांशी संपर्क वाढला आहे. पाटील यांच्या संस्थेत नुकत्याच पार पडलेल्या रांगोळीच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी गर्दी केल्याने काँग्रेस नेत्यांच्या भुवया ताणल्या गेल्या.

गेल्या काही दिवसांपासून पृथ्वीराज पाटील यांच्या निवासस्थानीही सत्ताधारी नेत्यांच्या भेटी वाढल्या आहेत. काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्षपद त्यांच्याकडे असले तरी मागील दहा वर्षात ते जेवढे पक्षात सक्रिय होते तेवढे आता नाहीत. आंदोलने, बैठका, पक्षीय कार्यक्रम यांच्या नियोजनापासून ते दूर झाले आहेत. सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. एका बाजूला पृथ्वीराज पाटील यांचा गट तर दुसरीकडे जयश्रीताई पाटील यांचा गट आहे. या दोन्ही गटांमधील संघर्ष कायम आहे. खासदार विशाल पाटील यांचाही भाजप नेत्यांशी सलोखा वाढल्याने तसेच त्यांना भाजप प्रवेशाच्या उघड ऑफर मिळत असल्याने महापालिका क्षेत्रात काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पक्षाचे शहर जिल्हाध्यक्षांच्या भूमिकेवरूनही संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. सत्ताधारी पक्षातील नेत्यांशी त्यांची सलगी भविष्यातील वेगळ्या भूमिकेचे संकेत देणारी ठरत आहे. पृथ्वीराज पाटील यांच्या मिरजेतील संस्थेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विश्वविक्रमी रांगोळीचा उपक्रम पार पडला. रांगोळीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. कार्यक्रमाला आमदार सुरेश खाडे, आमदार इद्रिस नायकवडी, आमदार सत्यजीत देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, भाजपा नेते मकरंद देशपांडे आदी भाजप नेत्यांनी हजेरी लावली.

त्याच दिवशी शिंदेसेनेचे नेते पर्यटन तथा खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनीही पृथ्वीराज पाटील यांच्या घरी भेट देत त्यांच्याशी संवाद साधला. गेल्या काही दिवसांपासून भाजप, शिंदेसेनेच्या नेत्यांचा काँग्रेस शहराध्यक्षांशी जुळलेला स्नेहबंध नव्या समीकरणाचे संकेत देत आहे.

महापालिका निवडणुकीत काय होणार?

सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत प्रदीर्घ काळ काँग्रेसचे वर्चस्व राहिले. मागील निवडणुकीत भाजपने सत्ता मिळविली, तरीही काँग्रेसचे अस्तित्व महापालिकेत दिसून आले. पक्षातील फुटीचे चित्र पाहता महापालिका निवडणुकीत पक्षाची मोट बांधणे काँग्रेस नेत्यांना कसरतीचे ठरणार आहे.

Web Title: BJP leaders throng Sangli Congress city president Prithviraj Patil recent program at his organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.