ऐन हिवाळ्यात राजकीय रणांगण तापणार; सांगली महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपचा बैठकीवर जोर, काँग्रेस-राष्ट्रवादीत शांतता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 18:28 IST2025-10-16T18:28:13+5:302025-10-16T18:28:50+5:30
आरक्षण सोडतीकडे लक्ष, सत्तेच्या शर्यतीला सुरुवात

ऐन हिवाळ्यात राजकीय रणांगण तापणार; सांगली महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपचा बैठकीवर जोर, काँग्रेस-राष्ट्रवादीत शांतता
सांगली : महापालिका निवडणुकीसाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता इच्छुक उमेदवारांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे लागले आहे. महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल डिसेंबर महिन्यात वाजणार असून, ऐन हिवाळ्यात शहरातील राजकीय रणांगण तापणार आहे. सत्तेच्या सिंहासनासाठी भाजप, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी व शिवसेनेत चढाओढ सुरू झाली आहे.
महापालिका निवडणुकीची अधिकृत घोषणा डिसेंबर महिन्यात होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. प्रशासकीय पातळीवर निवडणुकीची तयारी जोरदार सुरू आहे. प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर आता मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ पर्यंतची विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. या यादीवरून महापालिका निवडणुकीसाठी विधानसभेची यादी वापरून प्रारूप मतदार यादी तयार करून ती हरकती व सूचना मागवण्याकरिता ६ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
यावर १४ नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना हरकती व सूचना घेण्यासाठी मुदत आहे. या हरकतींवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदारांनी २८ नोव्हेंबरपर्यंत तयार करण्याची मुदत आहे. ४ डिसेंबरला मतदान केंद्राची यादी जाहीर होणार असून, १० डिसेंबरला मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे काम गतीने सुरू आहे.
मतदार याद्या निश्चित झाल्यानंतर महापालिका निवडणुकीची घोषणा होणार असल्याचे सांगण्यात येते. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल, तर जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मतदान होऊन निकाल हाती येतील. त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. ऐन हिवाळ्यात महापालिकेचे रणांगण तापणार आहे.
भाजपचा बैठकीवर जोर, काँग्रेस-राष्ट्रवादीत शांतता
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये बैठकीचा जोर सुरू आहे. नुकतेच पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत निवडणूक मोडवर या, असा आदेशच मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे. शहरातील पदाधिकारीही प्रभागनिहाय कार्यक्रम, बैठका घेऊन राजकीय जुळवाजुळव करीत आहेत. दुसरीकडे विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटात अद्याप शांतता आहे.
आरक्षण सोडतीकडे लक्ष
निवडणुकीची तयारी जोमाने सुरू असताना इच्छुक उमेदवारांचे आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे. प्रभागाचे आरक्षण चक्राकार पद्धतीने होणार की लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने, याचीच चिंता लागली आहे. सध्या तरी २०१८ चे आरक्षण कायम राहील, असे गृहीत धरून इच्छुकांनी तयारी चालविली आहे; पण राखीव गटात महिला आरक्षण निश्चित झाल्यास इच्छुकांच्या तयारीवर पाणी फिरणार आहे. त्यात महापौरपदाची सोडतही अद्याप रखडली आहे. महापौरपद कोणत्या गटासाठी राखीव होते, यावरही साऱ्यांचेच लक्ष आहे.