सांगली जिल्हा नियोजनमध्ये भाजपचे वर्चस्व, राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 17:24 IST2025-06-11T17:24:03+5:302025-06-11T17:24:41+5:30
अजितदादांच्या टेबलवर फाइल

संग्रहित छाया
सांगली : जिल्हा नियोजन समितीमध्ये भाजपचे वर्चस्व असून, राष्ट्रवादीला दुसऱ्या क्रमांकाची सदस्य संख्या मिळाली आहे. शिवसेनेला कमी सदस्य संख्या मिळाल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीतील घटक पक्षांनाही ताकदीप्रमाणे स्थान देण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्यात रखडलेली नियोजन समितीचे सदस्य निश्चित करण्यासाठी तब्बल सहा महिन्यांचा काळ लोटला आहे. नवीन यादीतील नावे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निश्चित केली असून, ही यादी अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली. जिल्हा नियोजन मंडळाच्या यादीमध्ये शिवसेनेचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांच्या एकमेव नावाचा समावेश आहे.
भाजपमधील आमदार गोपीचंद पडळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, माजी अध्यक्ष दीपक शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख हे चार सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील व प्रा. पद्माकर जगदाळे या दोघांचा समावेश आहे. तर जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आणि रयत क्रांती संघटनेचे अमोल पाटील यांचाही यादीत समावेश आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या स्वाक्षरीने ही यादी अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आली आहे. या यादीला शासनाची मंजुरी येत्या दोन दिवसात मिळण्याची शक्यता असून, नवीन नियोजन मंडळाची बैठक दि. १४ अथवा १६ जून रोजी बोलावली जाणार असल्याचे सांगण्यात आले. शासनाने अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतरच सदस्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत.
सांगली नियोजन मंडळाची सदस्य संख्या ४० असून, यांपैकी ३२ सदस्य जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांमधून निवडण्यात येतात. मात्र, या निवडणुकाच झाल्या नसल्याने निवडणूक होईपर्यंत या जागा रिक्त राहणार आहेत. आमदार, खासदार हे नियोजन मंडळाचे पदसिद्ध सदस्य असून, पालकमंत्री अध्यक्ष आहेत, तर जिल्हाधिकारी हे नियोजन मंडळाचे सदस्य सचिव आहेत.
अजितदादांच्या टेबलवर फाइल
जिल्हा नियोजन समिती सदस्यांची यादी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या टेबलवर आहे. अन्य पक्षांशी या समिती सदस्यांच्या यादीतील नावांबाबत चर्चा करून काही बदलही होऊ शकतो. पण, फारसा फरक होणार नाही, असेही खात्रीशीर सुत्रांनी सांगितले.