पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 09:31 IST2025-12-18T09:30:00+5:302025-12-18T09:31:23+5:30
Maharashtra Rape case news: ओळखीतील दोघांनी एका अल्पवयीन मुलीला कॉल करून बोलावून घेतले. त्यानंतर तिला एका रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या ऊसाच्या शेतात नेले. शेतात जात असताना मुलीला शंका आळी, तिने विरोध करताच आरोपींनी तिला मारहाण केली.

पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
Ishwarpur Crime News: आठवीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर ओळखीतील दोन जणांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूरमध्ये हा संतापजनक प्रकार घडला आहे. मुलीला फसवून आरोपी तिला एका उसाच्या शेतात घेऊन गेले. मुलीला शंका आली. तिने विरोध करताच आरोपींनी तिला मारहाण करत अत्याचार केले. तिचे कपडे घेऊन आरोपी नंतर तिथून निघून गेले. त्यामुळे विवस्त्र अवस्थेतच मुलीला चालत यावं लागलं. या भयंकर घटनेने ईश्वरपूरमध्ये खळबळ उडाली आहे.
लहानपणीच वडील गमावलेल्या मुलीचा गैरफायदा उठवत दोन जणांनी अपहरण केले. तिला उसाच्या शेतात नेऊन सामूहिक बलात्कार केला. मंगळवारी रात्री ९च्या सुमारास ही घटना घडली.
अत्याचार केल्यानंतर नराधमांनी पळून जाताना पीडितेचे कपडेही तिथे ठेवले नाही. त्यामुळे तिला विवस्त्र अवस्थेत शहरापर्यंत चालत यावं लागलं. या घटनेनंतर शहरात संतापाची लाट उसळली आहे.
नक्की काय घडलं?
१६ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ऋतिक महापुरे याने पीडित मुलीला कॉल केला आणि शिराळा नाक्यावर ये असे सांगितले. मुलीची आई कामावर गेलेली होती. ती घरी एकटीच होती. पीडित मुलगी नाक्यावर चालत गेली. तिथे महापुरे आणि त्याचा मित्र आशिष दुचाकी घेऊन थांबलेले होते.
दोघांनी तिला दुचाकीवर बसवले. पेठ-सांगली रस्त्यावर असलेल्या एका हॉस्पिटलच्या मागील उसाच्या शेतात नेले. तिथे गेल्यावर दोघे कपडे काढायला लागले. तेव्हा मुलीने विरोध करण्यास सुरूवात केली. महापुरे याने कमरेचा पट्टा काढून तिला मारहाण केली. खाली पाडले. त्यानंतर दोघांनी तिच्यावर अत्याचार केला.
अचानक होत असलेल्या या प्रकाराने मुलीने आरडाओरड सुरू केली, तेव्हा आरोपींनी तिचे तोंड दाबून ठेवले. तसेच तुला मारून टाकू, अशा धमक्याही दिल्या.
आई घरी आली तेव्हा घराला दिसले कुलूप
पीडित मुलीची आई मंगळवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास कामावरून घरी आली. मुलीबद्दल तिने आजूबाजूला चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत मुलगी न सापडल्याने तिने पोलिसांशी संपर्क केला. काही वेळात पोलीस पीडित मुलीस घेऊन आले. आईने मुलीकडे विचारपूस केल्यावर अमानुष घटनेचा उलगडा झाला. तेव्हा सगळ्यांनाच मोठा धक्का बसला.
चौकात आल्यावर मदतीला धावले नागरिक
माणुसकीला काळिमा फासल्याची घटना घडल्यानंतर पीडित मुलगी ही जवळपास १ किलोमीटर अंतर रात्रीच्या अंधारात विवस्त्र अवस्थेत चालत आली होती.
शहरालगतच्या एका चौकात आल्यावर नागरिकांनी तिला कपडे दिले. तसेच पोलिसांना बोलावून पीडित मुलीस त्यांच्या हवाली केले.
दोन नराधमांना अटक
पीडित मुलीच्या आईने ईश्वरपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली. माहितीनुसार, ऋतिक दिनकर महापुरे (वय २६) आणि आशिष जयवंत खांबे (वय २७, दोघे रा. खांबे मळा, कामेरी रस्ता, ईश्वरपूर) या दोघांविरुद्ध अपहरण, बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंद केला आहे.