तीन वर्षात २० लाखांच्या परताव्याचे आमिष; चौघांना पावणे सहा लाखांचा गंडा, दोघांवर सांगलीत गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:13 IST2025-12-25T13:13:16+5:302025-12-25T13:13:34+5:30
काही दिवसातच कंपनीचे कार्यालय बंद केले

तीन वर्षात २० लाखांच्या परताव्याचे आमिष; चौघांना पावणे सहा लाखांचा गंडा, दोघांवर सांगलीत गुन्हा
सांगली : कंपनीत १ लाख १९ हजार रुपये गुंतवल्यास ३ वर्षात २० लाख रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवून चौघांची ५ लाख ७६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत संशयित संजय बाळू डोळस (रा. पुणे) व राम सदाशिव कांबळे (रा. तासगाव) या दोघांविरूद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत दाजी कृष्णा पाटील (वय ६८, रा. जयसिंगपूर) यांनी फिर्याद दिली आहे.
संशयित संजय डोळस व राम कांबळे या दोघांनी दाजी पाटील यांना रॅपिड टेक्नॉलॉजी या कंपनीत १ लाख १९ हजार रुपये गुंतवणूक केल्यास तीन वर्षात वीस लाख रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवले. डोळस व कांबळे यांच्यावर विश्वास ठेवून पाटील यांनी १ लाख १९ हजार रुपयांची गुंतवणूक दोघांकडे केली.
पाटील यांचे मित्र मनोज साळसकर यांचे तीन लाख रुपये, संदेश कांबळे यांचे दोन लाख रुपये, तर श्यामसुंदर सूर्यवंशी यांचे तीस हजार रुपये असे एकूण ५ लाख ७६ हजार रुपये रॅपिड टेक्नॉलॉजी या कंपनीत गुंतवण्यात आले होते.
कंपनीने विश्रामबाग येथील कोरे युनिव्हर्सल बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावर कार्यालय सुरू केले होते. काही दिवसातच कंपनीचे कार्यालय बंद करण्यात आले. गुंतवणूकदार पाटील यांनी पाठपुरावा केल्यानंतर १ लाख १९ हजार रुपयांपैकी ७३ हजार रुपये परत करण्यात आले. मात्र, ४६ हजार रुपये दिले नाहीत. इतर तिघांचे ५ लाख ३० रुपयेही परत केले नाहीत.
वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने दाजी पाटील व इतर चौघांनी संजय डोळस व राम कांबळे यांच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली. त्यानुसार दोघांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.