हुंडा देणे-घेणे, प्री-वेडिंग टाळा; वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर सांगलीत मराठा समाजाकडून लग्नाची आचारसंहिता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 18:30 IST2025-06-03T18:30:00+5:302025-06-03T18:30:42+5:30

सांगली : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाविषयी संताप व निषेध व्यक्त करत सांगलीच्या मराठा समाजाने लग्नांसाठी आचारसंहिता तयार केली ...

Avoid giving and taking dowry, pre-wedding; Maratha community issues code of conduct for marriage in Sangli after Vaishnavi Hagavane case | हुंडा देणे-घेणे, प्री-वेडिंग टाळा; वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर सांगलीत मराठा समाजाकडून लग्नाची आचारसंहिता

हुंडा देणे-घेणे, प्री-वेडिंग टाळा; वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर सांगलीत मराठा समाजाकडून लग्नाची आचारसंहिता

सांगली : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाविषयी संताप व निषेध व्यक्त करत सांगलीच्यामराठा समाजाने लग्नांसाठी आचारसंहिता तयार केली आहे. लग्नसोहळा पार पाडताना रूढी-परंपरेला फाटा द्यावा, साधेपणाने लग्नकार्य व्हावे, प्री-वेडिंगसारखे खर्चिक प्रकार टाळावे, अशा गोष्टींचा त्यात समावेश करण्यात आला आहे.

मराठा समाज संस्थेचे सरचिटणीस जयवंत सावंत, ॲड. विलास हिरूगडे-पवार, ॲड. उत्तमराव निकम आदींनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर सर्व सामाजिक क्षेत्रात वेगळी चर्चा सुरू आहे. त्यातून मराठा समाजात लग्नाचे प्रदर्शन होत आहे, असे चित्र उभे केले आहे. रूढी, परंपरा नष्ट होण्यासाठी मराठा समाज संस्था गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. हुंडा प्रथा नष्ट झाली पाहिजे. लग्नातील खर्च आटोक्यात आणला पाहिजे.

श्राद्धाविधीवरील खर्च कमी व्हावा, तीन दिवसांत सर्व श्राद्धविधी व्हावेत. शेतीकडे व्यवसाय म्हणून बघितले पाहिजे, अशा गोष्टींसाठी उपक्रम राबविले. हगवणे परिवाराचा आम्ही निषेध व्यक्त करतो. त्या कुटुंबावर बहिष्कार टाकला पाहिजे. मराठा समाजाने आता लग्नसोहळे कशा प्रकारे करावेत, यासाठी आचारसंहिता बनविली आहे. ही आचारसंहिता समाजातील सर्व कुटुंबापर्यंत घेऊन जाऊन प्रबोधन केले जाईल.

यावेळी रोहित पाटील, दत्तात्रय सावंत, चकोर पाटील, रघुनाथराव पाटील, शशिकांत डांगे, नितीन शिंदे, चंद्रकांत पाटील, विजय भगत, अभिजीत पाटील, ए. डी. पाटील, प्रदीप कार्वेकर, ज्ञानेश पवार, हरिदास पाटील, अशोक पाटील, उदय निकम, विशाल पाटील, पंडितराव पाटील, अमोल चव्हाण, प्रकाश पाटील, राजेंद्रसिंह पाटील, रवींद्र खिलारे, विकास पाटील, दीपक मोरे आदी उपस्थित होते.

आचारसंहिता कशी असेल

  • लग्न शंभर लोकांच्या उपस्थितीत साधेपणाने करावे.
  • हुंडा देणे व घेणे बंद करावे.
  • प्री-वेडिंग पद्धत चुकीची असल्याने तिला पायबंद घालावा.
  • आहेर देणे व घेणे टाळावे.
  • लग्नात पारंपरिक वाद्यांचा वापर करावा.
  • कर्जे काढून लग्नसोहळा करू नये.
  • हिडीस नृत्यासारखे प्रकार टाळावेत.
  • फेटा फक्त नवरदेवाला बांधावा.
  • भेट म्हणून वृक्षरोप, पुस्तके द्यावीत.
  • लग्नातील खर्चाऐवजी ठेव पावती करावी.
  • साखरपुडा, हळद, लग्न एकाच दिवशी करावेत.
  • जेवणात फक्त पाच पदार्थ ठेवावेत.
  • इतरांची नक्कल न करता ऐपतीप्रमाणे खर्च करावा.
  • वधू-वरांना उचलून घेण्याची प्रथा टाळावी.

Web Title: Avoid giving and taking dowry, pre-wedding; Maratha community issues code of conduct for marriage in Sangli after Vaishnavi Hagavane case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.