सांगली : शिंदेसेनेचे उपजिल्हाप्रमुख हरिदास लेंगरे आणि सांगली शहरप्रमुख सचिन कांबळे यांच्यावर सोमवारी सायंकाळी लक्ष्मीमंदिर ते कुपवाड रस्ता परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न झाला. लेंगरे यांच्या मोटारीवर दगड फेकून काच फोडली. याप्रकारानंतर संतप्त शिंदेसेना समर्थकांनी संजयनगर पोलिस ठाणे गाठून हल्लेखोरांवर कारवाईची मागणी केली. उपजिल्हाप्रमुख हरिदास लेंगरे यांची पत्नी प्रभाग क्रमांक ८ मधून निवडणूक लढवत आहेत. सोमवारी सायंकाळी प्रचारानंतर लेंगरे आणि कार्यकर्ते यांनी कुपवाड फाटा येथे हॉटेलमध्ये चहा घेतला. त्यानंतर लेंगरे व चालक संजय सरगर हे मोटारीतून जात असताना दोघेजण तेथे आले. ‘हरी लेंगरे कोण? त्याला गोळ्या घालणार आहे’ अशी धमकी दिली. तेव्हा दोघांची दिशाभूल करण्यासाठी लेंगरे पुढे गेलेत, असे सांगितले. दोघेजण पुढे जाताच लेंगरे मोटारीत बसून निघाले. तेव्हा हल्लेखोरांना लेंगरे मोटारीत बसल्याचे समजले. त्यांनी गाडीच्या काचेवर मोठा दगड फेकला. काच फुटून तो आत आला. यामध्ये चालक सरगर व लेंगरे यांना काच लागून जखमी झाले.
वाचा: सांगली महापालिका निवडणुकीत 'रिक्षावाल्यां'चे चिन्हही 'ऑटो रिक्षा'च, अनोख्या योगायोगाची रंगतदार चर्चाया घटनेपूर्वी कुपवाड रस्त्यावरील बालाजीनगर येथे शहरप्रमुख सचिन कांबळे हे मित्रासमवेत गेले होते. बालाजीनगर पेट्रोलपंपाजवळ ओळखीच्या चौघांनी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. कांबळे यांना मारहाण करताच ते तत्काळ मोटारीत बसले. तेव्हा मित्रांनी मोटार सुरू करून तत्काळ त्यांना घटनास्थळावरून दूर नेले.
एकाच परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी शिंदेसेना पदाधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याचे समजताच पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी संजयनगर पोलिस ठाणे गाठले. जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, रावसाहेब घेवारे, महेंद्र चंडाळे आदी उपस्थित होते. त्यांनी हल्लेखोरांवर कारवाईची मागणी केली. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.