Sangli: मिरज सिव्हिलमध्ये खून प्रकरणातील आरोपींवर हल्ल्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 17:35 IST2025-11-12T17:33:31+5:302025-11-12T17:35:32+5:30
एक जण ताब्यात, रिव्हॉल्वर व कोयता जप्त; तिघे फरार

Sangli: मिरज सिव्हिलमध्ये खून प्रकरणातील आरोपींवर हल्ल्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
मिरज : मिरजेत खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण याच्यावर बुधवारी मिरज सिव्हिलमध्ये खुनी हल्ल्याचा प्रयत्न झाला. यावेळी पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी एका हल्लेखोराला ताब्यात घेत रिव्हॉल्वर व कोयता जप्त केला. त्याचे तीन साथीदार फरार झाले आहेत. या घटनेमुळे मिरज सिव्हिलमध्ये खळबळ उडाली.
मिरजेतील निखिल कलगुटगी खून प्रकरणी शहर पोलिसांच्या कोठडीत असलेले आरोपी सलीम पठाण, चेतन कलगुटगी, विशाल शिरोळे, सोहेल तांबोळी यांना वैद्यकीय तपासणीसाठी बुधवारी दुपारी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. त्यांच्यासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, हवालदार राजेश गवळी, प्रवीण वाघमोडे व सचिन सनदी हे पोलीस पथक होते.
सलीम पठाण याची वैद्यकीय तपासणी सुरू असताना वंश वाली हा संशयित गुन्हेगार बाहेर थांबला असल्याचे हवालदार राजेश गवळी यांना दिसले. हवालदार गवळी यांनी तत्परतेने त्यास पकडून झडती घेतली असता त्याच्याकडे परदेशी बनावटीचे पूर्ण लोडेड रिव्हॉल्वर सापडले. वाली याची पोलिसांशी झटापट सुरु असताना त्याच्यासोबत आलेले अन्य तीन साथीदार तेथे कोयता टाकून पसार झाले. या प्रकारामुळे सिव्हिल परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.
सलीम पठाण याच्याशी वैर असल्याने त्याच्यावर रिव्हॉल्वर व कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्याचा वंश वाली व त्याच्या साथीदारांचा कट होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा डाव उधळला गेला. या घटनेमुळे सिव्हिल परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. पळून गेलेल्या आरोपींच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक प्रणील गिल्डा, निरीक्षक किरण चौगुले व सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांनी भेट देऊन या घटनेची माहिती घेतली. याप्रकरणी हवालदार राजेश गवळी यांनी गांधी चौक पोलिसात फिर्याद दिली असून वंश वाली व त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलीम याचा गेम करण्यासाठी आला
मिरजेत कमान वेस परिसरात फेब्रुवारी महिन्यात कुणाल वाली या तरुणाचा खून करण्यात आला होता. कुणाल याची टीप सलीम पठाण याने दिल्याच्या संशयाने कुणाल याचा भाऊ वंश वाली याने त्याचा काटा काढण्याचे ठरविले होते. त्यानुसार तो सौरभ पोतदार, वैभव आवळे व अन्य एकास सोबत घेऊन सिव्हिलमध्ये सलीम याचा गेम करण्यासाठी आला होता अशी माहिती मिळाली. वंश वाली, सौरभ पोतदार, वैभव आवळे हे सर्वजण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.