आटपाडीत ओबीसी आरक्षणाने समीकरणे बदलली, अनेक मातब्बर इच्छुकांच्या तयारीवर पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 19:12 IST2025-10-07T19:11:44+5:302025-10-07T19:12:57+5:30
भाजपा व शिंदेसेनेतच खरी लढत; राष्ट्रवादी अजित पवार गट व काँग्रेस कोणती भूमिका घेणार?

आटपाडीत ओबीसी आरक्षणाने समीकरणे बदलली, अनेक मातब्बर इच्छुकांच्या तयारीवर पाणी
लक्ष्मण सरगर
आटपाडी : आटपाडी नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत मोठा राजकीय भूकंप झाला आहे. सोमवारी जाहीर झालेल्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीत आटपाडी नगराध्यक्षपद ओबीसी (खुला) या प्रवर्गासाठी राखीव जाहीर झाल्याने अनेक मातब्बर इच्छुकांच्या राजकीय तयारीवर पाणी फिरले आहे. गेल्या काही वर्षांपासून नगराध्यक्षपद डोळ्यांसमोर ठेवून कामाला लागलेल्या अनेक दिग्गज नेत्यांना यामुळे मोठा धक्का बसला आहे.
आटपाडी नगरपंचायत स्थापन होऊन तीन वर्षांचा कालावधी उलटत आला असून, या कालावधीत पहिल्याच निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. राजकीय घडामोडींना वेग आला होता. अनेक नेत्यांनी ‘खुला पुरुष’ आरक्षणाची शक्यता गृहीत धरून प्रचारयंत्रणा सज्ज केली होती. काहींनी संघटनात्मक हालचालींना गती देत कार्यकर्त्यांशी संपर्क मोहीम सुरू केली होती. मात्र, आता ओबीसी प्रवर्ग घोषित झाल्याने त्यांची संपूर्ण समीकरणे कोलमडली आहेत. यामुळे आटपाडीत नव्या राजकीय समीकरणांची जमवाजमव सुरू झाली आहे.
ओबीसी समाजात आता रस्सीखेच होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या प्रवर्गात अनेक दिग्गज तसेच उदयोन्मुख चेहरे नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. अनेकांना आरक्षण हे खुला प्रवर्ग पडेल, असे अपेक्षित होते. मात्र तसे न झाल्याने नाराजीचे सूर उमटले आहेत. आता नेतेमंडळींना ‘ओबीसी समाजातच उमेदवार निश्चित करावा लागेल’ अशा चर्चा रंगल्या आहेत. निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष आणि स्थानिक गटांमध्ये उमेदवार निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
आटपाडी नगराध्यक्षपदासाठी ओबीसी प्रवर्गातील योग्य, जनसंपर्क असलेला आणि मतदारांमध्ये लोकप्रिय चेहरा शोधणे, ही आता प्रत्येक राजकीय गटासमोरील मोठी डोकेदुखी ठरणार आहे. नगराध्यक्षपदासाठी अपेक्षाभंग झालेल्या काही इच्छुकांनी आता नगरसेवकपदाकडे लक्ष केंद्रित केले आहे, तर काहींनी ओबीसी प्रवर्गातील नेत्यांसोबत युती करण्याचे संकेत दिले आहेत. एकूणच, आरक्षण सोडतीनंतर आटपाडी नगरपंचायतीतील निवडणुकीचे राजकीय तापमान अचानक वाढले असून, आगामी काही दिवसांत नवीन आघाड्या, युती आणि भांडणांची नवी मालिका रंगणार, हे निश्चित झाले आहे.
कुणबी दाखले निर्णायक ठरणार का?
दरम्यान, ओबीसी खुला आरक्षण जाहीर झाल्याने कुणबी दाखले काढलेल्या अनेकांना आता ओबीसी प्रवर्गातून उमेदवारी करता येऊ शकत असल्याने कुणबी दाखले काढलेल्यांची भूमिका काय असणार आहे किंवा नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.