पलूसचा शहीद जवान अथर्व कुंभार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, पावसात ३ तास सुरू होती अंत्ययात्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 15:45 IST2025-07-09T15:44:45+5:302025-07-09T15:45:09+5:30
कुटुंबाचा आक्रोश मन हेलावणारा : अंत्यदर्शनासाठी हजारोंची उपस्थिती

पलूसचा शहीद जवान अथर्व कुंभार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, पावसात ३ तास सुरू होती अंत्ययात्रा
पलूस (जि.सांगली) : येथील शहीद जवान लेफ्टनंट अथर्व संभाजी कुंभार (वय २६) यांच्यावर मंगळवारी हजारो नागिरकांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अथर्व कुंभार हा बिहार येथील गया ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीत (ओटीए) मध्ये प्रशिक्षण घेत होता. दि. ६ रोजी मध्यरात्री १२:०० वाजता लष्कराच्या २० किलोमीटर धावण्याच्या सरावात १९.५ किलोमीटर धावत टास्क पूर्ण करणाऱ्या अथर्वला शेवटच्या टप्प्यात हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. सोमवारी पुणे येथे विमानाने त्याचे पार्थिव आणण्यात आले.
वाचा - धावण्याच्या सरावावेळी पलूसच्या जवानाचा मृत्यू, चार महिन्यांपूर्वी झाली होती लेफ्टनंट पदी निवड
मंगळवारी पुण्यातून पार्थिव लष्कराच्या शासकीय इतमामात ७:०० वाजता पलूस येथे आणून अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. ८:३० वाजता शहरातील प्रमुख रस्त्यांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून अंत्ययात्रा काढण्यात आली. यात ‘अमर रहे, अमर रहे अथर्व कुंभार अमर रहे, भारतमाता की जय, अशा घोषणांनी शहर दणाणून गेले होते.
देशभक्तीवरील गीतांनी अंत्ययात्रा उभ्या पावसात ३ तास सुरू होती. अंत्ययात्रेत राजारामबापू मिल्ट्री स्कूल व शहरातील विविध शिक्षण संस्थांचे विद्यार्थी, आजी - माजी सैनिक, विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी झाले होते.