चांदोली धरणातून विसर्ग सुरु, वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर; शाहूवाडीतील गावांचा संपर्क तुटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 14:41 IST2022-08-12T14:40:58+5:302022-08-12T14:41:59+5:30
नदीकाठावरील पिके पाण्याखाली असल्याने शेकडो एकर जमिनीतील पिकांचे नुकसान

चांदोली धरणातून विसर्ग सुरु, वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर; शाहूवाडीतील गावांचा संपर्क तुटला
श्रीनिवास नागे
सांगली : चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग आणि धरणक्षेत्रातीलपाऊस यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. आज, शुक्रवारी सकाळी शिराळा तालुक्यातील चरण ते सोंडोली पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील सोंडोली, मालगाव, विरळे, मालेवाडी, खेडे जांबुरसह काही गावांचा संपर्क तुटला आहे.
चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन चरण-सोंडोली पूल पाण्याखाली गेला. यापूर्वी आरळा-शित्तूर पूल आणि कोतोली-रेठरे पुलावर पाणी आले आहे.
शिराळा तालुक्यातील चरण, आरळा, शेडगेवाडी प्रमुख बाजारपेठा असून शाहूवाडी तालुक्यतील लोकांना बाजार, शाळा यासह विविध कारणांसाठी या गावांत यावे लागते. हा पूल पाण्याखाली गेल्याने बाजारकरूंसह शालेय मुलांची गैरसोय झाली आहे.
सकाळपासून पावसाची उघडझाप सुरू असली तरी वारणेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गेली काही दिवस नदीकाठावरील पिके पाण्याखाली असल्याने शेकडो एकर जमिनीतील पिकांचे नुकसान होणार आहे.