प्रेमसंबंध मान्य नसल्याने बापानेच केला मुलीचा भोसकून खून, सांगलीतील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 12:15 IST2023-07-03T12:14:32+5:302023-07-03T12:15:16+5:30

त्यानंतर वडील व तिच्या अन्य नातेवाईकांनी आत्महत्या केल्याचा बनाव केला

As the love relationship was not acceptable, the father stabbed the daughter to death in Sangli | प्रेमसंबंध मान्य नसल्याने बापानेच केला मुलीचा भोसकून खून, सांगलीतील धक्कादायक घटना

प्रेमसंबंध मान्य नसल्याने बापानेच केला मुलीचा भोसकून खून, सांगलीतील धक्कादायक घटना

विटा (जि. सांगली) : प्रेमसंबंधाच्या रागातून स्वत:च्या १७ वर्षांच्या मुलीचा बापानेच चाकूने भोसकून खून केला. ही घटना शनिवारी रात्री साडेसहा वाजण्याच्या सुमारास मंगरूळ (ता. खानापूर) येथे घडली. या हल्ल्यात श्रेया संतोष जाधव (वय १७) हिचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी हल्लेखोर वडील संतोष जगन्नाथ जाधव (वय ४५) याला पोलिसांनी अटक केली आहे.
शेतकरी असलेला संताेष जाधव हा पत्नी, दाेन मुली, मुलगा यांच्यासह मंगरूळ येथे राहताे. त्याची मुलगी श्रेया ही विटा येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात बारावी शास्त्र शाखेत शिक्षण घेत होती. तिचे कार्वे (ता. खानापूर) येथील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. हे प्रेमसंबंध वडील संतोष याला मान्य नव्हते. 

‘त्या तरुणाशी बाेलत जाऊ नकाेस,’ असे त्याने श्रेयाला अनेकदा बजावले हाेते. तरीही श्रेया त्या तरुणाच्या संपर्कात हाेती. शनिवारी सायंकाळी श्रेया घरात स्वयंपाक करीत असताना वडील संतोष व आई तिला ‘प्रेमसंबंध ठेवू नको, तुझे अठरा वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर लग्न लावून देतो,’ असे समजावून सांगत होते. मात्र, श्रेया काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती.

त्यामुळे संतापलेल्या संतोष याने श्रेयाच्या छातीवर डाव्या बाजूला भाजी कापण्याच्या चाकूने वार केला. या हल्ल्यात श्रेया गंभीर जखमी झाली. विटा येथील रुग्णालयात उपचारासाठी आणत असताना तिचा वाटेतच मृत्यू झाला. त्यानंतर वडील संतोष व तिच्या अन्य नातेवाईकांनी श्रेयाने आत्महत्या केल्याचा बनाव केला. मात्र, संशय बळावल्याने पोलिसांनी संतोष जाधव याची रविवारी कसून चौकशी केली. त्याने श्रेयाला चाकूने भोसकून ठार मारल्याची कबुली पाेलिसांसमाेर दिली.

Web Title: As the love relationship was not acceptable, the father stabbed the daughter to death in Sangli