दहा दिवसांत अचानक वाढल्या बीएएमएसच्या तब्बल ९२० जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 08:37 AM2023-11-12T08:37:20+5:302023-11-12T08:37:29+5:30

आयुर्वेदिक महाविद्यालयांमधील प्रवेशात शासनाचे ‘बैल गेला अन् झोपा केला’

As many as 920 BAMS seats suddenly increased in ten days | दहा दिवसांत अचानक वाढल्या बीएएमएसच्या तब्बल ९२० जागा

दहा दिवसांत अचानक वाढल्या बीएएमएसच्या तब्बल ९२० जागा

- अविनाश कोळी

सांगली : महाराष्ट्र सी.ई.टी. सेलमार्फत आयुष अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आली असतानाच १० नोव्हेंबर रोजी अचानक ८ नवीन आयुर्वेदिक महाविद्यालयांमधून ५६० जागा भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसांत १२ महाविद्यालयांमध्ये एकूण ९२० जागा अचानक वाढल्यामुळे इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी संताप व्यक्त करत आहेत. गतवर्षीपेक्षा यावर्षी नीट परीक्षेसाठी ५० हजारांहून अधिक विद्यार्थी पात्र झाल्याने यावर्षी एम.बी.बी.एस. आणि  इतर अभ्यासक्रमांचा कट-ऑफ वाढला आहे. 

अनेक विद्यार्थ्यी गेले दुसरीकडे 
एम.बी.बी.एस.नंतर विद्यार्थ्यांचा सर्वाधिक ओढा बी.ए.एम.एस.कडे असतो. कट-ऑफ वाढल्यामुळे आयुर्वेदिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणार नाही म्हणून कमी गुण असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी दंतवैद्यकीय, होमिओपॅथी तसेच इतर अभ्यासक्रमांना नाइलाजाने प्रवेश घेतला.

जागा वाढलेली आयुर्वेद महाविद्यालये 

प्रवेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना ३१ ऑक्टोबर रोजी यवतमाळ येथील सुमतीबाई ठाकरे आयुर्वेद कॉलेज, अहमदनगरचे रत्नदीप आयुर्वेद कॉलेज, आयुर्वेद कॉलेज अहमदनगर या तीन नवीन कॉलेजेसमधून तिसऱ्या फेरीत २६० जागांसाठी नव्याने परवानगी देण्यात आली. ६ नोव्हेंबर रोजी चौथ्या फेरीत प्रदीप पाटील आयुर्वेद कॉलेज शाहुवाडी या कॉलेजमधून १०० नवीन जागांसाठी नव्याने परवानगी देण्यात आली. आणि आता १० नोव्हेंबर रोजी अचानकपणे तब्बल ८ नवीन आयुर्वेद कॉलेजमधून ५६० जागा भरण्यास पाचव्या फेरीत परवानगी देण्यात आली आहे. इतर अभ्यासक्रमांना याआधी प्रवेश घेतलेला आहे, त्यांना मात्र वाढलेल्या कॉलेजेसमध्ये प्रवेश घेता येणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये अन्यायाची भावना आहे.

प्रवेश प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात आयुर्वेद महाविद्यालयांना इतक्या मोठ्या संख्येने परवानगी देणे योग्य नाही. प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच वैद्यकीय महाविद्यालयांच्या मान्यतेचा घोळ मिटवला पाहिजे. राज्यात आता २२ सरकारी आणि ८२ खासगी आयुर्वेद महाविद्यालये आहेत. नवीन महाविद्यालये वाढविण्यापेक्षा आहे त्या महाविद्यालयांचा दर्जा आणखी सुधारणे आवश्यक आहे.
    - डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशक, सांगली

Web Title: As many as 920 BAMS seats suddenly increased in ten days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.