Sangli Crime: झरे बँक लॉकर फोडणाऱ्या टोळीतील आणखी एकास अटक, १३ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 17:54 IST2026-03-27T17:54:07+5:302026-03-27T17:54:22+5:30
सव्वातीन कोटींहून अधिक मुद्देमाल जप्त

Sangli Crime: झरे बँक लॉकर फोडणाऱ्या टोळीतील आणखी एकास अटक, १३ लाखांचा मुद्देमाल जप्त
सांगली : झरे (ता. आटपाडी) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे लॉकर फोडणाऱ्या टोळीतील संशयित आदेश बाबूराव शर्मा (वय ३०, रा. हसनपूर, जि. बदायू, उत्तर प्रदेश) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सातारा जिल्ह्यात अटक केली. त्याच्याकडून १३ लाख ९५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आतापर्यंत टोळीतील सात जणांना अटक केली आहे.
झरे येथे दि. ७ जानेवारी रोजी मध्यरात्रीनंतर उत्तर प्रदेशातील टोळीने सांगली जिल्ह्यातील साथीदारांच्या मदतीने जिल्हा बँकेच्या शाखेतील पाठीमागील खिडकीची काच फोडून गज गॅस कटरने कापले. त्यानंतर आत प्रवेश करून लॉकर रूममधील २२ लॉकर गॅस कटरने तोडले. ग्राहकांनी ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोकड चोरी केली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती.
स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने या टोळीचा छडा लावण्यात यश मिळवले. पथकाने संशयित राहुल रंजमीश शर्मा (रा. ककराला, जि. बदायू, उत्तर प्रदेश), विश्वजित विजय पाटील (रा. बांबवडे, ता. पलूस), संकेत अरुण जाधव (रा. बलवडी, ता. खानापूर), इजाज राजू अत्तार (रा. आमणापूर, ता. पलूस), अस्लम ऊर्फ टनटन मिठ्ठोरी खान (रा. ककराला, उत्तर प्रदेश), शकील अकबर कुरेशी (रा. इस्लामनगर, उत्तर प्रदेश) या सहा जणांना अटक केली होती.
गुन्हे अन्वेषणचे सहायक निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकाला टोळीतील संशयित आदेश शर्मा हा सातारा जिल्ह्यात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर सॅकमध्ये १३ लाख ८५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख १० हजार ५०० रुपये, असा एकूण १३ लाख ९५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळाला. चौकशीत त्याने दोन महिन्यांपूर्वी चोरी केल्याची कबुली दिली.
गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक कळेकर, कर्मचारी संदीप नलावडे, संदीप गुरव, सागर टिंगरे, अमिरशा फकीर, नागेश खरात, अतुल माने, सागर लवटे, अनिल कोळेकर, दरिबा बंडगर, सोमनाथ गुंडे, रणजित जाधव, सतीश माने, मच्छिंद्र बर्डे, उदयसिंह माळी, अमर नरळे, अरुण पाटील, महादेव नागणे आदींच्या पथकाने कारवाई केली.
सव्वातीन कोटींहून अधिक मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने यापूर्वी अटक केलेल्या सहा जणांकडून ३ कोटी २५ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अद्याप टोळीतील काही जण पसार असून, त्यांचा शोध सुरू आहे.