Sangli: ठकसेन दिनेश पुजारीविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल, ‘अभियांत्रिकी’ला प्रवेश देतो सांगून चौघांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 19:44 IST2025-11-11T19:42:47+5:302025-11-11T19:44:47+5:30
सांगली : महापालिकेतील नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या ठकसेन दिनेश पुजारी याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल ...

Sangli: ठकसेन दिनेश पुजारीविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल, ‘अभियांत्रिकी’ला प्रवेश देतो सांगून चौघांची फसवणूक
सांगली : महापालिकेतील नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या ठकसेन दिनेश पुजारी याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. अभियांत्रिकी महाविद्यालयात मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देतो असे सांगून चौघांची १२ लाख ८४ हजार रुपयांची फसवणूक केल्याबद्दल मयुरेश मधुसूदन अभ्यंकर (रा. गुलमोहोर कॉलनी) यांनी सोमवारी सायंकाळी फिर्याद दिली. ठकसेन पुजारी याने आणखी काही जणांची फसवणूक केली असून आणखी काही तक्रारी दाखल होण्याची शक्यता आहे.
ठकसेन पुजारी याने महापालिकेत नोकरी लावतो असे सांगून वैभव रावसाहेब दानोळे याच्याकडून ३ लाख ४० हजार रुपये रोख घेतले होते. त्याला बनावट नियुक्तिपत्र दिले होते. या फसवणुकीबद्दल कामगार अधिकारी विनायक शिंदे यांनी पुजारीविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर ठकसेन पुजारी याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अभ्यंकर यांच्या मुलास डिग्रीसाठी प्रवेश हवा होता. त्यांच्या मुलाच्या मित्राकडून दिनेश पुजारी हा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो, अशी माहिती मिळाली. अभ्यंकर यांना भेटल्यानंतर पुजारी याने मॅनेजमेंट कमिटीत नातेवाईक असल्याचे सांगून सुरुवातीला ३ लाख रूपये मागितले. त्यानुसार २६ जुलै २०२४ रोजी अभ्यंकर यांनी ३ लाख रुपयांचा धनादेश दिला. पहिल्या राऊंडला प्रवेश न मिळाल्याने विचारल्यानंतर आणखी एक लाख मागितले. ते ऑनलाईन ॲपवरून पाठवले.
दुसऱ्या राऊंडमध्येही प्रवेश न मिळाल्याने विचारणा करताच आणखी एक लाख मागितले. ते देखील दिले. पाच लाख रुपये देऊनही प्रवेश न मिळाल्याने पुजारी याला विचारताच त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. महाविद्यालयात विचारणा केल्यानंतर प्रवेश झाला नसून फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. चौकशी केल्यानंतर पुजारी याने विवेक बाबासाहेब माने यांच्याकडून ३ लाख ५० हजार रुपये, मुकुंद अण्णा कुंभार यांच्याकडून २ लाख ८४ हजार रूपये, शिरीष कृष्णाजी पाटील यांच्याकडून १ लाख ५० हजार रूपये घेतल्याचे समजले.
फसवणूकप्रकरणी विवेक माने यांनी सात महिन्यांपूर्वी तक्रार अर्ज दिला होता. महापालिकेच्या फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अभ्यंकर यांनी पाठपुरावा केला. अखेर सोमवारी सायंकाळी अभ्यंकर यांची फिर्याद नोंदवून घेतली. चौघांची १२ लाख ८४ हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुजारीवर गुन्हा दाखल केला.
तक्रारदारांना आवाहन
ठकसेन पुजारी याने सांगलीतील चौघांसह कोल्हापूर जिल्ह्यातील काही विद्यार्थ्यांच्या पालकांची फसवणूक केल्याचे चौकशीत समोर आले आहे. फसवणूक झालेल्या पालकांनी पोलिस ठाण्याकडे तक्रार द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.