भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि त्याच्या वडिलांसंदर्भात वापरलेल्या अपशब्दांमुळे राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. पडळकरांच्या त्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष चांगलाच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आज पक्षाच्या वतीने सांगलीमध्ये 'संस्कृती बचाव मोर्चा'चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी नाव न घेता, पडळकर आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार निषाणा साधला.
पडळकर यांचं नाव न घेता कोल्हे म्हणाले, "सांगलीत आल्यानंतर अनेक वेळा 'ते' संबोधन ऐकू यायचं, कळलं नव्हतं नेमकं काय? त्या दिवशीचं विधान झाल्यावर कळलं, आहो ज्याला मातृत्वाच्या नात्याचं पावित्र्य कळत नाही, त्याला मंगळसूत्राचे पावित्र्य कधी कळणार? आईचे नाते हे जगातले एकमेव असे नाते आहे, जे नऊ महिने बाळाला गर्भात ठेवल्यानंतर, पोटच्या लेकराने लाथा मारल्या, तरीही त्याला आपल्या काळजातले दूध पाजते. त्या आईच्या नात्याचा असा अवमान होत असताना, मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि सत्तेचे मलिदे चाटणाऱ्या मंत्र्यांना हा सवाल आहे, कुणाची छाती झाली नाही? की पाठीचा मणका राहिला नाही तुम्हाला? एका मातेचा अपमान होत असताना, महाराष्ट्रातल्या मातृत्वाचा अपमान होत असताना, कान धरून हा माणूस चुकतोय, हा स्वाभीमान कुणाचा जागृत राहिला नाही, हे दुर्दैव आहे आज महाराष्ट्राचं. या गोष्टीचं वाईट वाटतंय."
कोल्हे पुढे म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपल्याकडून अपेक्षा आहे, आपण एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहात. विधान आल्यानंतर आमची तुमच्याकडून ही अपेक्षा होती. राज्याचे प्रमुख म्हणून होती. कारण तुम्ही एका पक्षाचे नाही, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. पण आपले विधान काय आले, एक आक्रमक नेते आहेत. म्हणून तुम्ही असे, स्वैर सोडाणार असाल, तर लहानपणी आम्हाला एक म्हण शिकवली होती, "A man is known by the company he keeps". म्हणजे, माणसाच्या आजूबाजूला जशी माणसं असतात, तसाच तो माणून असतो. हे खरे असेल, तर या वाचाळविरांनी आपली प्रतिमा डागाळली जाते आणि आम्हाल काळजी आपली व्यक्तीगत असण्यापेक्षा, आपण आमच्या राज्याचे प्रमुखा आहेत याची आम्हाला अधिक काळजी आहे." मुख्यमंत्र्यांना आवाहन करताना कोल्हे म्हणाले, "मुख्यमत्रीसाहेब तुमच्याकडूनतरी अपेक्षा आहे की, आता तरी पाठीशी घालण्यापेक्षा काण धरा, काण उपटा, आपण अशाच वाचाळवीरांविषयी मौन बाळगत राहिलात, तर द्रोपदीचं वस्त्रहरण होत असताना, भीष्म, द्रोण, कृपाचार्यासारखी भूमिका तुम्ही बजावत आहात असे म्हणायचे की, अप्रत्यक्षपणे पाटिंबा देणाऱ्या धृतराष्ट्राची तुमची भूमिका आहे, असे आम्ही समजायचे. याचे उत्तर आम्हाला द्या." येवेळी कोल्हे यांनी त्यांना एकाने लिहून दिलेला शेरही ऐकवला. ते म्हणाले, "ईडी, ईव्हीएम, भोंकने वाले कुत्ते, फौज तो तेरी भारी है, जंजिरो मे जकडा हुआ जयंत पाटील अभी तुम सब पे भारी है"."