Sangli Politics: "पडळकर, पाटील सारखेच"; पक्षातूनच अडथळे आणले तर काय करायचे?, अमरसिंह देशमुख यांचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 16:14 IST2025-11-03T16:11:49+5:302025-11-03T16:14:05+5:30
पडळकर, पाटील सारखेच

Sangli Politics: "पडळकर, पाटील सारखेच"; पक्षातूनच अडथळे आणले तर काय करायचे?, अमरसिंह देशमुख यांचे टीकास्त्र
आटपाडी : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आटपाडीत भाजपच्या देशमुख गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी थेट आमदार गोपीचंद पडळकर आणि शिंदेसेनेचे नेते तानाजी पाटील यांच्यावर टीका केली. तसेच जिल्हा परिषदेसह आटपाडीत भाजपची सत्ता हवी आहे; पण स्वतःच्या लोकांनीच अडथळे आणले तर काय करायचे?, असा थेट सवाल देशमुख यांनी कार्यकर्त्यांना केला.
आटपाडीत रविवारी नगरपंचायत क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. या वेळी माजी सभापती भागवत माळी, दादासाहेब मरगळे, अरुण बालटे, सुमनताई नागणे, ऋषिकेश देशमुख, महेश देशमुख, दिग्विजय देशमुख, आनंदराव ऐवळे, महिपतराव पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यकर्त्यांनी या बैठकीत पडळकरांशी युतीबाबत तीव्र मतभेद व्यक्त केले. काहींनी भाजपसोबत राहण्याची बाजू मांडली, तर अनेकांनी पडळकरांसोबत युती नको असा पावित्रा घेतला. या पार्श्वभूमीवर अमरसिंह देशमुख म्हणाले, मुंबईत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाली. या बैठकीत पडळकरही होते. पण भाजपचाच एक गट आमच्या विरोधात काम करत असेल, तर आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा? अशी भूमिका मांडली आहे.
अमरसिंह देशमुख म्हणाले, राजकीय विरोध ठीक आहे; पण आम्हाला शिव्या का? विधानसभा निवडणुकीत दोन तास नावे ठेवली आणि नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या कानात सांगून शरद पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. अशी दुहेरी भूमिका का?, असाही प्रश्न त्यांनी विचारला.
पडळकर, पाटील सारखेच
पडळकर व शिंदेसेनेचे तानाजी पाटील दोघेही सारखेच असून, दोघांनीही राजकीय त्रासच दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अमरसिंह देशमुख म्हणाले, २०१९ मध्ये आम्ही अनिल बाबर यांना मदत केली; पण त्याचा उपयोग झाला नाही. बँक निवडणुकीत आमच्याच मतदारांना पैसे देऊन उचलले. कारखाना निवडणुकीत दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी प्रयत्न केले, मात्र त्यांचे तानाजी पाटील यांनी ऐकलेच नाही. मग आम्ही काय करावे? तानाजी पाटील आणि पडळकर गट यांनी एकत्र येऊन राजकारण करावे. आम्हाला विरोध करण्यासाठी एकत्र येता, मग आता तालुक्याच्या राजकारणासाठी एकत्र या, असे सांगत त्यांनी पडळकर व पाटील गटालाही थेट इशारा दिला आहे.