Municipal Election 2026: महायुतीचा प्रयत्न; पण राष्ट्रवादीचा वेगळाच सुरू; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 19:22 IST2025-12-20T19:21:20+5:302025-12-20T19:22:38+5:30
गटबाजी सुरू असल्याच्या चर्चा चुकीच्या

Municipal Election 2026: महायुतीचा प्रयत्न; पण राष्ट्रवादीचा वेगळाच सुरू; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य
मिरज : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा प्रयत्न सुरू असला तरी सांगलीप्रमाणेच काही ठिकाणी राष्ट्रवादीचे वेगळेच काहीतरी सुरू आहे. आता त्यांनी काय करायचे ते ठरवावे, असे सूचक वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिरजेत पत्रकार परिषदेत केले.
स्थानिक पातळीवर भाजप व राष्ट्रवादीमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरजेत १५ माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. यात भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटातील माजी नगरसेवकांचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या तुलनेत भाजपमध्ये कमी पक्षप्रवेश होत असल्याच्या प्रश्नावर भाजपमध्ये आवश्यक तेवढे प्रवेश यापूर्वीच झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात २९ महापालिका निवडणुकांत भाजप, शिंदेसेना, आरपीआय, जनसुराज्य पक्ष व रयत क्रांती पक्ष यांच्यासोबत महायुती करण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यासाठी बैठकादेखील सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गटबाजी सुरू असल्याच्या चर्चा चुकीच्या
राष्ट्रवादीचे आमदार ईद्रीस नायकवडी यांनी महापौर राष्ट्रवादीचाच होणार असा दावा केला आहे. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘महापौर आमचाच होणार, असे प्रत्येकजण म्हणत असतो. मात्र महापौर भाजपचाच होणार, हे विधिलिखित आहे.निवडणूक प्रभारी म्हणून मकरंद देशपांडे यांची नियुक्ती झाल्यानंतर पक्षात गटबाजी सुरू असल्याच्या चर्चाही चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, अतुल भोसले, भाजप प्रभारी मकरंद देशपांडे, निवडणूक प्रमुख शेखर इनामदार, भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, पृथ्वीराज पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.