महापालिका निवडणुकीत अजितदादा महायुतीबरोबरच : चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 14:16 IST2025-12-06T14:15:20+5:302025-12-06T14:16:32+5:30
सोयीच्या आघाड्या नसतील

महापालिका निवडणुकीत अजितदादा महायुतीबरोबरच : चंद्रकांत पाटील
सांगली : नगरपालिका संख्या जास्त असल्यामुळे आणि पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना संधी देणे शक्य न झाल्यामुळे कुठे महायुती आणि अनेक ठिकाणी स्थानिक आघाडीसाठी सर्वच पक्षांना सवलत दिली होती. त्यामुळे सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार पक्षाबरोबर आघाडी केली होती. मात्र, महापालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढविण्याचा निर्णय झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारही महायुतीतच असणार आहेत, अशी स्पष्ट भूमिका भाजपचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली.
सांगलीत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर पालकमंत्री पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘नगरपालिका निवडणुकांमध्ये स्थानिक इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या जास्त असते. या निवडणुकांमध्ये सर्व कार्यकर्त्यांना संधी देणे शक्य नाही. त्यामुळे कुठे महायुती तर कुठे स्थानिक नेत्यांना आघाडी करण्याबाबत अधिकार दिले होते.
यामुळे सांगली जिल्ह्यातील जत, शिराळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाशी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आघाडी केली होती. काही ठिकाणी भाजपनेही स्थानिक आघाड्या केल्या होत्या. नगरपालिका निवडणुका संपल्यामुळे आता महायुती म्हणून महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने महायुतीच्या नेत्यांचीही बैठक झाली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत अजित पवारांचा पक्ष महायुतीसोबतच असेल. कोणत्याही प्रकारची स्थानिक आघाडी होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.