धाकट्या भावाच्या अंत्यसंस्काराहून परतल्यानंतर थोरल्या भावाचे निधन, सांगली जिल्ह्यातील दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 15:29 IST2026-01-09T15:29:22+5:302026-01-09T15:29:35+5:30
किर्लोस्करवाडी : संपूर्ण आयुष्य प्रेमाचे असंख्य क्षण जगणाऱ्या दोन भावांच्या आयुष्याचा शेवट एकाच दिवशी झाल्याने त्यांच्या नात्याची अनोखी कहाणी ...

धाकट्या भावाच्या अंत्यसंस्काराहून परतल्यानंतर थोरल्या भावाचे निधन, सांगली जिल्ह्यातील दुर्दैवी घटना
किर्लोस्करवाडी : संपूर्ण आयुष्य प्रेमाचे असंख्य क्षण जगणाऱ्या दोन भावांच्या आयुष्याचा शेवट एकाच दिवशी झाल्याने त्यांच्या नात्याची अनोखी कहाणी सध्या चर्चेत आली आहे. रामानंदनगर (ता. पलूस) येथील इंगळे परिवारातील वयोवृद्ध धाकट्या भावाचे निधन झाले. त्याचे अंत्यसंस्कार आटोपून घरी परतलेल्या थोरल्या भावानेही प्राण सोडले. अवघ्या पाच तासांत दोघा भावांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बुधवारी दुपारी तीनच्या दरम्यान लक्ष्मण इंगळे (वय ८३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर रात्री आठ वाजता रामानंदनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. घरी आल्यानंतर त्यांचे थोरले बंधू बाळकृष्ण इंगळे (वय ८६) यांचेही निधन झाले. या दोन्ही घटना अवघ्या पाच तासांमध्ये घडल्या. दोघेही आजारी होते. लक्ष्मण इंगळे हे गेले दोन महिने आजारी होते. तर बाळकृष्ण इंगळे १० दिवसांपासून. दोघे बंधू किर्लोस्कर कंपनीमधून सेवानिवृत्त झाले होते.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत इंगळे भावंडांना आईने खूप कष्ट करत मोठे केले. कुटुंबातील सर्व मुलांनी चांगले शिक्षण घेतले आहे. लक्ष्मण इंगळे, त्यांची मुले प्रवीण, सचिन आणि पुतणे डॉ. संदीप इंगळे यांचे गावात सामाजिक कार्य आहे. दोन्ही बंधूंमध्ये प्रेमभाव असल्याने एकाच दिवशी या घटना घडल्या असाव्यात, अशी चर्चा नागरिकांत आहे. त्यांच्यातील बंधुप्रेम पाहून अनेकांचे डोळे पाणावले. दोन्ही भावांचे एकत्रित रक्षाविसर्जन शुक्रवारी सकाळी नऊ वाजता रामानंदनगर स्मशानभूमी येथे आहे.