निशिकांत पाटलांच्या विधान परिषद उमेदवारीसाठी कार्यकर्त्याने लिहिले रक्ताने पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 14:10 IST2022-06-03T14:10:04+5:302022-06-03T14:10:41+5:30
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लिहिले रक्ताने पत्र

निशिकांत पाटलांच्या विधान परिषद उमेदवारीसाठी कार्यकर्त्याने लिहिले रक्ताने पत्र
आष्टा : इस्लामपूरचे नगराध्यक्ष व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांना विधान परिषदेवर संधी मिळाली पाहिजे. यासाठी आष्टा येथील भाजपचे कार्यकर्ते व भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण माने यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना रक्ताने पत्र लिहिले आहे.
निशिकांत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचा विचार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर शहरासह इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात विकास कामे केली आहेत. भविष्यातील देशाचे धोरण इस्लामपूर विधानसभा मतदार संघासह सांगली जिल्ह्यातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी निशिकांत पाटील यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत आहेत.
सर्वसामान्य जनतेत यांनी आपल्या कर्तृत्वातून एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. इस्लामपूर विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली असून राजकीय सामाजिक कार्य करीत असताना विरोधकांकडून त्यांना अडचणीत आणण्याचे प्रकार घडत आहेत. भाजप पक्ष वाढविण्यासाठी त्याना विधान परिषदेवर काम करण्याची संधी मिळावी, अशी मागणीही प्रवीण माने यांनी केली आहे. त्यांनी रक्ताने पत्र लिहिल्याने हे पत्र सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे.