वकिलांच्या गैरहजेरीने महापालिकेला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:26 IST2021-04-11T04:26:45+5:302021-04-11T04:26:45+5:30

सांगली : रस्त्यासाठी नुकसान भरपाई देण्याच्या प्रकरणात न्यायालयात महापालिकेचे वकील गैरहजर राहिल्याने निकाल विरोधात गेला असून न्यायालयाने संबंधितांना ८४ ...

Absence of lawyers hit the Municipal Corporation | वकिलांच्या गैरहजेरीने महापालिकेला फटका

वकिलांच्या गैरहजेरीने महापालिकेला फटका

सांगली : रस्त्यासाठी नुकसान भरपाई देण्याच्या प्रकरणात न्यायालयात महापालिकेचे वकील गैरहजर राहिल्याने निकाल विरोधात गेला असून न्यायालयाने संबंधितांना ८४ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करून वकिलांकडून झालेल्या नुकसानीची वसुली करावी, अशी मागणी नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी आयुक्तांकडे केली आहे.

साखळकर यांनी याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कुपवाड येथील एका जागेतून रस्ता गेल्याने त्याच्या नुकसान भरपाईचा विषय न्यायालयात होता. एका माजी नगरसेवकाने वटमुखत्यावरपत्राच्या आधारे या जागेची नुकसान भरपाई यापूर्वीच घेतली आहे. त्यावेळीही हा विषय वादग्रस्त बनला होता. मात्र, ही नुकसान भरपाई समाधानकारक नसल्याचे सांगत संबंधित माजी नगरसेवकाने महापालिकेविरोधात न्यायालयात दावा दाखल केला. गेली काही दिवस या दाव्यावर न्यायालयात सुनावणी सुरू होती. मात्र, याप्रकरणी पालिकेच्या वतीने वकील न्यायालयात हजरच झाले नाहीत.

वकिलांच्या गैरहजेरीमुळे काही दिवसांपूर्वी या प्रकरणाचा निकाल पालिकेविरोधात गेला असून, न्यायालयाने संबधितांना ८४ लाख रुपयांची वाढीव नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. वकील गैरहजर राहिल्याने न्यायालयानेही ताशेरे ओढले आहेत. महापाालिका पॅनलवरील वकील पालिकेच्या आर्थिक हिताविरोधात काम करत असल्याची तक्रार यापूर्वीच आम्ही आयुक्तांकडे केली होती. त्यामुळे संबंधित वकिलांची चौकशी करावी, सदरची नुकसान भरपाई वकिलांकडूनच वसूल करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: Absence of lawyers hit the Municipal Corporation