नाशिक जिल्ह्यातील अपहृत तरुणाची सांगलीतून सुटका, दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 13:34 IST2025-03-20T13:33:37+5:302025-03-20T13:34:06+5:30
सांगली : नाशिक जिल्ह्यातून आर्थिक देवाणघेवाणीतून अपहरण केलेल्या निहाल सुभाष पवार (वय २३, रा. अंजनाळे, जि. धुळे) याची अलकूड ...

नाशिक जिल्ह्यातील अपहृत तरुणाची सांगलीतून सुटका, दोघांना अटक
सांगली : नाशिक जिल्ह्यातून आर्थिक देवाणघेवाणीतून अपहरण केलेल्या निहाल सुभाष पवार (वय २३, रा. अंजनाळे, जि. धुळे) याची अलकूड फाटा (ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सुटका केली.
अपहरण करणाऱ्या शरद बाळासाहेब गलांडे (वय २२, रा. रांजणी, ता. कवठेमहांकाळ), शंकर दत्तात्रय गिड्डे (वय २२, रा. रामपूरवाडी रस्ता, करोली टी, ता. कवठेमहांकाळ) या दोघांना अटक केली. तिघांना नाशिक ग्रामीणमधील वडनेर खाकुर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले.
आर्थिक देवाणघेवाणीतून निहाल पवार याचे दि. १६ रोजी संशयित शरद गलांडे व शंकर गिड्डे या दोघांनी करंजगव्हाण (जि. धुळे) शिवारातून बळजबरीने मोटारीतून अपहरण केले. त्यानंतर निहाल याच्या सुटकेसाठी त्याच्या नातेवाइकांकडे पैशाची मागणी केली. याप्रकरणी मीनाबाई सुभाष पवार यांनी वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिस हवालदार दीपक गायकवाड यांना कवठेमहांकाळ येथील अलकूड फाट्याजवळ संशयित थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने अलकूड फाटा येथे जाऊन बंद असलेल्या मका फॅक्टरीच्या आवारात सापळा रचला. फॅक्टरीच्या आवारात काळ्या रंगाची मोटार थांबल्याची दिसली. चौकशीत दोघांनी शरद गलांडे व शंकर गिड्डे अशी नावे सांगितली.
गाडीची तपासणी केल्यानंतर पाठीमागील सीटवर घाबरलेल्या अवस्थेत तरुण आढळला. त्याला खाली उतरवून चौकशी केल्यानंतर निहाल पवार असे नाव सांगितले. तसेच पैशाच्या कारणातून दोघांनी अपहरण केल्याचे सांगितले.