सांगलीत नववर्षाच्या स्वागतालाच कॉलेजसमोर तरूणाचा भरदिवसा खून, पोलिसांनी अवघ्या दोन तासात संशयितांना घेतलं ताब्यात
By घनशाम नवाथे | Updated: January 1, 2026 18:03 IST2026-01-01T18:01:51+5:302026-01-01T18:03:15+5:30
भरदिवसा हा हल्ल्याचा थरार पाहून विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली

सांगलीत नववर्षाच्या स्वागतालाच कॉलेजसमोर तरूणाचा भरदिवसा खून, पोलिसांनी अवघ्या दोन तासात संशयितांना घेतलं ताब्यात
सांगली : नववर्षाच्या स्वागतालाच कॉलेज कॉर्नर परिसरातील एन.एस. लॉ कॉलेजच्या दारात पूर्ववैमनस्यातून विष्णू सतीश वडर (वय २३, रा. वडर काॅलनी) याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. खूनानंतर दोघे संशयित पसार झाले. अवघ्या दोन तासात विश्रामबाग पोलिसांनी संशयित आर्यन हेमंत पाटील (वय २३, रा. रत्नदीप हौसिंग सोसायटी, कुपवाड) याला साथीदारासह ताब्यात घेतले आहे. दीड वर्षापूर्वी आर्यनवर ज्या चौकात हल्ला झाला होता, त्याच चौकात विष्णूवर वार करून हल्ल्याचा बदला घेतल्याचा प्रकार घडला.
संशयित आर्यन पाटील आणि मृत विष्णू वडर यांच्यात दीड वर्षापूर्वी रागाने बघण्यावरून वाद झाला होता. आर्यन पाटील हा तेव्हा छायाचित्रकार म्हणून काम करत होता. रागाने का बघितलास म्हणून त्याच्यावर एन.एस. लाॅ कॉलेजच्या दारात असलेल्या चौकात एक जुलै २०२४ रोजी चाकूने हल्ला करण्यात आला होता. याबाबत मृत विष्णू वडर, पृथ्वीराज कलकुटगी आणि मंथन नामक तरूणाविरूद्ध तेव्हा गुन्हा दाखल झाला होता.
दीड वर्षापूर्वी झालेल्या हल्ल्याचा आर्यन पाटील याला राग होता. लॉ कॉलेजच्या बाहेर राॅयल टॉवरसमोरील चौकात काही टोळक्यांचा अड्डा बनला होता. तेथे विष्णू वडर साथीदारांबरोबर थांबत होता. गुरूवारी दुपारी दोनच्या सुमारास कॉलेज सुटल्यानंतर अद्यापही वर्दळ होती. विश्रामबागचा पोलिस कर्मचारी फेरफटका मारून गेला होता. तेवढ्यात पूर्वीच्या वादातून विष्णू याच्यावर आर्यन आणि साथीदाराने चाकूसारख्या धारदार शस्त्राने हल्ला चढवला. डोक्यात, पोटावर आणि मांडीवर वार झाल्यानंतर तो गंभीर जखमी होऊन पडला. भरदिवसा हा हल्ल्याचा थरार पाहून विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यात घबराट पसरली. चौकातील दुकानांनी पटापट शटर खाली ओढले.
हल्लेखोर पसार झाल्यानंतर नागरिकांनी जखमी विष्णू याला सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर उपअधीक्षक संदीप भागवत, विश्रामबागचे पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे आदींनी भेट दिली. तत्काळ पोलिसांची पथके रवाना झाली. विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या दोन तासात दोघा संशयितांना ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतू अन्य काही कारण आहे काय? याचा तपास सुरू आहे.