सांगली जिल्ह्यातील सोनी येथे तरुणाचा खून, ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान खुनाच्या घटनेने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 19:43 IST2022-12-13T11:23:13+5:302022-12-13T19:43:24+5:30
खुनाच्या या घटनेने गावात एकच खळबळ उडाली

सांगली जिल्ह्यातील सोनी येथे तरुणाचा खून, ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान खुनाच्या घटनेने खळबळ
सदानंद औंधे
मिरज : सोनी तालुका मिरज येथे आज, मंगळवारी मध्यरात्री एका पैलवान तरुणाचा धारदार हत्याराने डोक्यात वार करुन खून करण्यात आला. आकाश माणिक नरुटे (वय २२) असे या मृत तरुणाचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. खुनाच्या या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.
सोनी गावात ग्रामपंचायत निवडणूक सुरु असून राष्ट्रवादीच्या निवडणूक प्रचारात असलेल्या आकाश यास दोघांनी बोलावून दुचाकीवर बसवून नेले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत आकाश याचा मोबाइल बंद असल्याने त्याची शोधाशोध केली. यानंतर रात्री बारा वाजता गावाजवळ करोली रस्त्यावर इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आकाश याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले. आकाश याच्या डोक्यात व पाठीवर धारदार हत्याराने अनेक वार केले होते.
भावासोबत शेती करणारा आकाश हा पैलवान होता. त्याचे काही दिवसापूर्वी गावातील काही जणांसोबत भांडण झाले होते. त्यातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. सोनीत ग्रामपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादीचे दिनकर पाटील विरुद्ध भाजपचे राजू माळी गटात लढत होत आहे. आकाश नरुटे हा राष्ट्रवादीचे दिनकर पाटील यांचा समर्थक होता.