Sangli News: द्राक्षे विकणाऱ्या महिलेस भरधाव मोटारीने ठोकरले; जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 16:39 IST2023-03-09T16:39:03+5:302023-03-09T16:39:22+5:30
जखमींवर कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू

Sangli News: द्राक्षे विकणाऱ्या महिलेस भरधाव मोटारीने ठोकरले; जागीच मृत्यू
कडेगाव : राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड-विटादरम्यान येवलेवाडी हद्दीत भरधाव माेटारीने धडक दिल्याने रस्त्याकडेला द्राक्ष विक्रीसाठी बसलेली महिला जागीच ठार झाली. तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. शुभांगी विक्रम जाधव (वय ३५ रा. येवलेवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. अपघातात शुभांगी यांचे पती विक्रम कुंडलिक जाधव (३७), शरद महादेव जाधव (४१), मुकुंद हणमंत शेवाळे (३० सर्व रा. येवलेवाडी) जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी (दि. ८) घडली.
याप्रकरणी माेटार चालक राजेंद्र उर्फ संभाजी रामचंद्र घार्गे (वय ५९ रा. उपाळे मायणी ता. कडेगाव) याच्याविरोधात कडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येवलेवाडी येथील शुभांगी व विक्रम जाधव हे पती-पत्नी शेती तसेच रस्त्यालगत बसून द्राक्ष, वडापाव विक्रीचा व्यवसाय करत. बुधवारी नेहमीप्रमाणे शुभांगी व त्यांचे पती विक्रम हे कऱ्हाड-विटा या राष्ट्रीय महामार्गालगत रस्त्याकडेला झाडाखाली बसून द्राक्षे विक्री करीत होते. द्राक्ष खरेदी करण्यासाठी शरद जाधव हे त्यांच्याजवळ उभे होते.
यादरम्यान संभाजी घार्गे हे माेटार घेऊन (क्र एम.एच. १० सीएन ६९४१) कडेगावहून विट्याला निघाले होते. येवलेवाडी हद्दीत त्यांचा माेटारीवरील ताबा सुटल्याने माेटार थेट रस्त्याकडेला असलेल्या जाधव यांच्या द्राक्ष विक्रीच्या स्टॉलवर गेली. शुभांगी व विक्रम जाधव यांना माेटारीची जाेरदार धडक बसली. अपघातात शुभांगी यांचा मृत्यू झाला तर विक्रम जाधव व द्राक्ष खरेदी करण्यासाठी आलेले शरद जाधव हे गंभीर जखमी झाले. जखमींवर कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी अजित भिकू जाधव (वय ३७) यांनी कडेगाव पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक संदीप साळुंखे करीत आहेत.
दुचाकीस धडक
द्राक्षांच्या स्टॉलला धडक देऊन माेटार तशीच पुढे जात समाेर निघालेल्या दुचाकीवर (क्र. एम.एच. १० डीएक्स ९३५९) आदळली. यामध्ये दुचाकीस्वार मुकुंद हणमंत शेवाळे गंभीर जखमी झाले.