Sangli: पेपर अवघड गेला, दिघंचीत शालेय विद्यार्थ्यांने उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 19:20 IST2025-10-08T19:19:19+5:302025-10-08T19:20:32+5:30
पंधरा दिवसात आटपाडी तालुक्यातील चौथी घटना

Sangli: पेपर अवघड गेला, दिघंचीत शालेय विद्यार्थ्यांने उचलले टोकाचे पाऊल
दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथील तेरा वर्षीय शालेय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली आहे. स्वराज शिवाजी पुसावळे (वय १३) असे मुलाचे नाव आहे. सहामाहीचा पेपर त्याला अवघड गेला होता. त्यामुळे तो अस्वस्थ होता. तालुक्यात मागील पंधरा दिवसात शालेय विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याची ही चौथी घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.
स्वराज पुसावळे हा मलकापूर (ता. सांगोला) येथील एका खासगी शाळेत सातवीमध्ये शिकत होता. त्याचे वडील शिवाजी पुसावळे दिघंची गावचे महसूल सेवक म्हणून काम करीत आहेत. त्यांना एक मोठी मुलगी आणि मुलगा स्वराज होता. स्वराज शाळेला खासगी बसने रोज ये-जा करत होता. काल त्याचा सहामाहीचा पहिला पेपर झाला होता. तो अवघड गेला होता. त्यामुळे तो अस्वस्थ होता. दरम्यान, सोमवारी पहाटे त्याने घरात सर्वजण असताना गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना घरच्यांनी बघितल्यानंतर त्यांना जबर धक्का बसला. नातेवाइकांनी एकच हंबरडा फोडला. ग्रामीण रुणालयात शवविच्छेदन करून दुपारी दिघंची गावात अंत्यविधी झाला. गेल्या पंधरा दिवसांत आटपाडी तालुक्यात तीन महाविद्यालयीन तसेच शालेय विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. या सलग चौथ्या घटनेने तालुका हादरून गेला आहे. या आत्महत्येची आटपाडी पोलिस ठाण्यात नोंद केली आहे.