Milkha Singh birth anniversary: ‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग अन् शिराळ्यातील सुभेदार शेळके यांच्या मैत्रीचा सुवर्ण अध्याय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 19:23 IST2025-11-20T19:23:28+5:302025-11-20T19:23:53+5:30
‘फ्लाइंग सिख’समवेत गाजवल्या स्पर्धा; तीन युद्धांत सक्रिय सहभाग

Milkha Singh birth anniversary: ‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग अन् शिराळ्यातील सुभेदार शेळके यांच्या मैत्रीचा सुवर्ण अध्याय
विकास शहा
शिराळा : ‘फ्लाइंग सिख’ म्हणून जगभर प्रसिद्ध असलेले महान भारतीय धावपटू मिल्खा सिंग यांची आज ९६वी जयंती. पंजाबच्या या धावपटूचे शिराळा तालुक्याशी वेगळ्या अर्थाने घट्ट नाते जोडले गेले आहे. मिल्खा सिंग यांची शिराळ्यातील सुभेदार दिवंगत पांडुरंग यशवंत शेळके यांच्याशी असलेली दृढ, अविस्मरणीय मैत्री आजही स्थानिकांच्या मनात जिवंत आहे. दोघांची कारकीर्द भारतीय सैन्यातूनच सुरू झाली आणि दोघेही उत्कृष्ट धावपटू म्हणून नावाजले गेले.
१९५८ मध्ये मेरठ येथे झालेल्या ऑलिम्पिक निवड चाचणीतील ॲथलेटिक्स स्पर्धेत मिल्खा सिंग यांनी प्रथम क्रमांक, तर पांडुरंग शेळके यांनी तृतीय क्रमांक पटकावला होता. याच स्पर्धेनंतर दोघांची बटालियनमध्ये धावपटू म्हणून नियुक्ती झाली आणि चंडीगड ते शिराळा अशी मैत्रीची साखळी अधिक दृढ झाली. दोघांनीही सैन्यासाठी तसेच देशासाठी अनेक पदके जिंकत योगदान दिले. मेरठमध्ये शेळके यांनी पहिला क्रमांक मिळवला असता, तर त्यांच्या ऑलिम्पिक प्रवासाची दारेही उघडली असती, असे सहकाऱ्यांत आजही सांगितले जाते.
मिल्खा सिंग यांनी १९५८च्या राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत ४०० मीटरमध्ये सुवर्णपदके जिंकली. १९६० च्या रोम ऑलिम्पिकमध्ये त्यांनी राष्ट्रीय विक्रम नोंदवला आणि अंतिम फेरीत पोहोचणारे पहिले भारतीय ठरले. त्यांच्या धावत्या आयुष्याची गाथा ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटामुळे घराघरात पोहोचली. शिराळ्याचे सुपुत्र सुभेदार पांडुरंग शेळके यांनी ३८ वर्षे सैन्यसेवा केली. १९६२चे चीन युद्ध, १९६५ आणि १९७१ची भारत-पाक लढाई अशा तिन्ही युद्धांत त्यांनी शौर्याने सहभाग नोंदवला.
शिपाई ते सुभेदार शेळके यांचा प्रवास प्रेरणादायी
शिपाई ते सुभेदार हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरला. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये त्यांनी खेळ प्रशिक्षक म्हणून शेकडो जवानांना मार्गदर्शन केले. निवृत्तीनंतर शिराळ्यात माजी सैनिक संघटनेची स्थापना करून त्यांनी सैनिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठे काम केले. एक प्रयोगशील शेतकरी म्हणूनही त्यांनी अनेक पुरस्कारांची कमाई केली. त्यांच्या सेवेला एस. एस. मेडल, रक्षा मेडल, समर सेवा स्टार, जी. एस. मेडल (मिझो हिल्स), पश्चिमी स्टार, संग्राम मेडल व स्वातंत्र्यदिनी पुरस्कार अशा बहुमोल सन्मानांनी गौरविण्यात आले.