Sangli News: विकृत बापच बनला सैतान; मरणयातनांनी संपलं सपान, निष्ठुरतेच्या तीव्र झळांमध्ये कोमेजलेल्या कोवळ्या स्वप्नफुलांची दुर्दैवी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 14:10 IST2026-03-28T14:06:51+5:302026-03-28T14:10:54+5:30

अमानुष छळात एका निरागस जीवाचा मृत्यू झाला, तर दुसरी मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे

A girl died after her father left her hanging overnight in Banpuri Sangli district | Sangli News: विकृत बापच बनला सैतान; मरणयातनांनी संपलं सपान, निष्ठुरतेच्या तीव्र झळांमध्ये कोमेजलेल्या कोवळ्या स्वप्नफुलांची दुर्दैवी कहाणी

Sangli News: विकृत बापच बनला सैतान; मरणयातनांनी संपलं सपान, निष्ठुरतेच्या तीव्र झळांमध्ये कोमेजलेल्या कोवळ्या स्वप्नफुलांची दुर्दैवी कहाणी

लक्ष्मण सरगर

आटपाडी : मुलांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी स्वत:च्या शरीराचे हाल करून घेणाऱ्या आई-वडिलांच्या कहाण्या पावलोपावली कानावर पडतात. मात्र, या सर्वांमध्ये एक विकृत व अंगावर शहारे आणणारी कहाणी आटपाडी तालुक्यातील बनपुरीत घडली. अल्पवयीन मुलींच्या स्वप्नांचा गळा घोटताना त्यांना यमसदनी धाडणाऱ्या सैतान बापाने त्यांना पदोपदी छळले. माता-पित्यांचे घरच छळछावणी बनली असताना त्या दोन चिमुकल्या मुलींना मदतीचा हात देण्यासाठी कोणीही देवदूत म्हणून धावला नाही. निष्ठुर कुटुंबीयांच्या समोरच तडफडत यातील एकीने प्राण सोडले.

जेमतेम चार हजार लोकवस्तीचं गाव. गावापासून दीड किलोमीटरवर असलेली यमगर वस्ती. याच वस्तीवर यमगरांचं दोन खोल्यांचं घर. चार भिंती अन् वरून पत्र्याचं छप्पर. छोटासा शेतीचा तुकडा अन् थोडी जित्राबं दावणीला असलेल्या या घरातली चूल कशीबशी पेटते. क्रूरकर्मा दादू उर्फ दादा हैबती यमगर याला चार मुली अन् एक मुलगा अशी पाच अपत्यं. वर्षा (वय १४), अनुजा (वय ११), मृत ऋतुजा (९), माही (७) अन् सर्वात धाकटा पृथ्वीराज (६) या मुलांसह त्यांची आई अन् आजी-आजोबा असं ९ जणांचं हे कुटुंब या छोट्याशा घरात राहतं. गरिबीचं बोट पकडून विकृत पित्याने निमंत्रित केलेल्या क्रूरतेनंही याच घरात वास केलेला.

ज्या घरात ऋतुजाने जीव सोडला त्या ठिकाणी आजही तिच्या पायाला बांधलेले दोर लटकत होते. एका लोखंडी अँगलला बांधलेल्या दोरीतून तिची तडफड अन् वेदनांच्या किंकाळ्या जणू प्रकट होत होत्या. घरात भयाण शांतता होती. परिसरात अव्यक्त संताप अन् चीड दिसून येत होती. यापूर्वीही याच घरात या दोन्ही मुलींना बांधून मारहाण झाली होती. वारंवार या दोघींवर संशयाचे बोट उठत होते. कुटुंबीयांनी दादूच्या या छळाला पाठिंबा दिला होता. वस्तीवरल्या काही लोकांना त्याची कल्पना असूनही मदतीचा हात कुठूनही पोहोचला नाही.

भावंडांना दया आली, पण त्यांना धमकावले

पाषाणहृदयी आई-वडिलांना दया आली नाही. उलट मोठ्या बहिणीला व इतर भावंडांना धमकावून मुलींना पाणी देण्यासही मज्जाव केला. त्यामुळे अमानुष छळात ऋतुजा हिने जागीच प्राण सोडले, तर अनुजा गंभीर जखमी अवस्थेत आहे.

मैत्रिणींना धक्का

ऋतुजा ही जिल्हा परिषद शाळा पुकळेवस्ती येथे चौथीत शिकत होती, तर अनुजा बनपुरी गावातील शाळा क्रमांक २ मध्ये पाचवीत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून आयुष्य घडवण्याच्या वयातच ऋतुजावर मृत्यूचे सावट आले. तिच्या मृत्यूच्या बातमीने शाळेतल्या मैत्रिणींनाही हादरवले.

दारू, हिंसा अन् घरातील काळोख

आरोपी दादू यमगर हा दारूच्या नशेत अनेक वेळा क्रूर वागायचा, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली. घरात नेहमीच भांडणे, वाद आणि मारहाण सुरू असायची. विशेष म्हणजे, ऋतुजा आणि अनुजा या दोनच मुलींना तो लक्ष्य करायचा, तर इतर मुलांवर कधीच हात उचलला गेला नाही. चार दिवसांपूर्वी गावातील यात्रेतही आरोपीचे भावासोबत मोठे भांडण झाले होते. या घरातील हिंसाचार आणि विकृत वागणूक हे नवीन नव्हते.

दादूला पोलिसांनी केली अटक

या प्रकरणी आटपाडी पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३(१), १०९(१), ३५१(२), ३५१(३) अंतर्गत गुन्हा दाखल असून आरोपी वडील दादू यमगर यास अटक केली आहे.

Web Title : पिता बना शैतान; बेटियों को प्रताड़ित किया, एक की मौत, अटापडी में

Web Summary : अटापडी में, एक पिता और माँ ने चोरी के संदेह में अपनी बेटियों को प्रताड़ित किया, रात भर लटकाए रखा। एक बेटी की मौत हो गई, दूसरी जिंदगी के लिए जूझ रही है। पिता को गिरफ्तार कर लिया गया है, ऐसी क्रूरता के लिए सख्त सजा की मांग की जा रही है। समाज अपनी हस्तक्षेप करने में विफलता पर सवाल उठाता है।

Web Title : Father becomes devil; tortures daughters, one dead, in Atpadi.

Web Summary : In Atpadi, a father and mother tortured their daughters over suspected theft, hanging them overnight. One daughter died, the other fights for her life. The father is arrested, demanding stricter punishment for such cruelty. Society questions its failure to intervene.