शेअर मार्केटमधून जादा परताव्याचे आमिष, गडहिंग्लजमधील दाम्पत्याचा आटपाडीतील एकास सोळा लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 19:08 IST2025-03-17T19:07:46+5:302025-03-17T19:08:12+5:30
आटपाडी : गडहिंग्लज (जि. कोल्हापूर ) येथील एका दाम्पत्याने पिंपरी खुर्द (ता. आटपाडी) येथील एकास शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष ...

शेअर मार्केटमधून जादा परताव्याचे आमिष, गडहिंग्लजमधील दाम्पत्याचा आटपाडीतील एकास सोळा लाखांचा गंडा
आटपाडी : गडहिंग्लज (जि. कोल्हापूर ) येथील एका दाम्पत्याने पिंपरी खुर्द (ता. आटपाडी) येथील एकास शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून तब्बल सोळा लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पतंगराव गोविंद कदम (वय ४२, रा. पिंपरी खुर्द, ता. आटपाडी, जि. सांगली) यांनी मल्लेश धुंडाप्पा माळी आणि माधुरी मल्लेश माळी दोन्ही रा. झाडगल्ली, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर यांच्या विरोधात आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, मल्लेश धुंडाप्पा माळी आणि माधुरी मल्लेश माळी यांनी पतंगराव गोविंद कदम यांना गुंतवणूक रकमेवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवले. हिरा एम. डी. एम ट्रेड बोअर्स एलएलपी कंपनीमध्ये ५ ऑगस्ट २०२२ ते २७ डिसेंबर २०२२ या कालावधीत तब्बल २३ लाख रुपये गुंतवण्यास भाग पाडले. सुरुवातीला त्यांना परताव्याची रक्कम मिळाली. त्यानंतर त्यांना पैसे मिळाले नाहीत.
अनेकवेळा मागणी करून पैसे न मिळाल्याने मल्लेश धुंडाप्पा माळी आणि माधुरी मल्लेश माळी यांनी १५ लाख ९७ हजार ८४३ रुपये रक्कम परत न देता आर्थिक फसवणूक केली आहे, अशी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजीव केंद्रे करत आहेत.
शेअर मार्केटचा आटपाडी पॅटर्न
दरम्यान, आटपाडी तालुक्यात शेअर मार्केटच्या माध्यमातून शेकडो कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परताव्याच्या आमिषाला बळी पडून अनेक नागरिकांनी पैसे गुंतवले होते. सुमारे दहा ते पंधरा टक्के परतावा देणारा शेअर मार्केटचा आटपाडी पॅटर्न त्यावेळी गाजला होता.
मात्र, दोन वर्षांपूर्वी अचानक ट्रेडर्स घेणारे पळून गेल्याने अनेकांवर आर्थिक संकट कोसळले होते. यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. मात्र, गुंतवणूक केलेली रक्कम अद्याप अनेकांना मिळालीच नाही. राजकीय नेते मंडळींनी मात्र रक्कम परत घेतल्या असून, सर्वसामान्य नागरिक मात्र यात बुडाले आहेत.