सांगलीतील सराफाची २३ लाखाला फसवणूक, पाचजणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 15:31 IST2025-10-15T15:29:38+5:302025-10-15T15:31:22+5:30
शहर पोलिसांत तक्रार

सांगलीतील सराफाची २३ लाखाला फसवणूक, पाचजणांवर गुन्हा दाखल
सांगली : शहरातील एका सराफाकडून सोन्याचे दागिने घेऊन त्याचे पैसे न देता २३ लाख ५६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अमन शहाबुद्दीन पखाली (वय २५, रा. गवळी गल्ली) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वसीम शेख (रा. ५० फुटी रोड, गादी कारखान्याजवळ, शामरावनगर), त्याचा भाऊ मोसीन शेख, मित्र तेजस माने व राज सोनावले, सराफ धनाजी कदम या पाचजणांचा समावेश आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी पखाली यांचे शामरावनगरमध्ये एस. पी. ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते सराफी व्यवसाय करतात. त्यांच्या ओळखीचा वसीम शेख हा पत्नी, भावासह दुकानात आला. त्याने सोन्याचे लोटस्, चेन, सोन्याची तेंडुलकर चेन, अंगठी, कानातील टाॅप्स असा ११ लाख ८० हजार रुपयांचे, तर त्याचा भाऊ मोमीन याने चेन, लोटस चेन, कानातील रिंग असा ५ लाख ७० हजार रुपयांचे दागिने खरेदी केले.
दागिनेचे पैसे नंतर आणून देतो, असे सांगून ते निघून गेले. त्यानंतर १६ एप्रिल २०२५ रोजी वसीम हा त्याचा मित्र तेजस माने व राज सोनावले याच्यासह दुकानात आला. माने याने २ लाख एक हजाराचे, तर सोनावले याने ६ लाख ६ हजाराचे दागिने खरेदी केले. सायंकाळपर्यंत या दागिन्याचे पैसे देतो, असे सांगून वसीम मित्रासह निघून गेला.
त्यानंतर फिर्यादी पखाली यांनी वसीमकडे सातत्याने दागिन्याचे पैसे मागितले, पण त्याने काही ना काही कारण देत पैसे देण्यास टाळाटाळ केली. या चौघांनीही सोन्याचे दागिने सराफ कट्टा परिसरातील धनाजी कदम यांना विकले. त्यांनी ते दागिने मोडले. या पाचजणांनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच पखाली यांनी शहर पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. त्यानुसार पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.