४५ दिवसांत १२ टक्के परताव्याचे आमिष; सांगलीतील बहीण-भावाची २० लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 16:16 IST2025-12-30T16:15:38+5:302025-12-30T16:16:45+5:30
काही दिवसांत परतावा म्हणून ५ लाख रुपये त्यांना दिले. मात्र त्यानंतर परतावा दिला नाही.

४५ दिवसांत १२ टक्के परताव्याचे आमिष; सांगलीतील बहीण-भावाची २० लाखांची फसवणूक
सांगली : गुंतवणुकीवर ४५ दिवसांत १२ टक्के परताव्याचे आमिष दाखवून बहीण-भावाची तब्बल २० लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत गणेश प्रकाश सावंत (रा. जुना कुपवाड रस्ता, गजानन कॉलनी, सांगली) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयित नितीन शंकर यादव आणि अश्विनी नितीन यादव (रा. पंचमुखी मारुती रस्ता, लाळगे गल्ली, खणभाग) या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित नितीन यादव आणि अश्विनी यादव या दोघांची फिर्यादी गणेश सावंत आणि त्याच्या बहिणीशी ओळख होती. २०२२ मध्ये यादव दाम्पत्याने त्यांना ४५ दिवसांत १२ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. रेवा एंटरप्रायजेस पोर्ट फोलिओ या कंपनीत गुंतवणूक करण्यास त्यांना सांगितले. त्यानुसार गणेश सावंत यांच्याकडून २० लाख रूपये आणि त्यांची बहीण स्नेहल घोरपडे यांच्याकडून ५ लाख रूपये घेतले. २५ लाख रुपये दोघा संशयितांनी घेतले. काही दिवसांत परतावा म्हणून ५ लाख रुपये त्यांना दिले. मात्र त्यानंतर परतावा दिला नाही.
त्यामुळे बहीण-भावांनी गुंतविलेली रक्कम परत मागितली. मात्र दोघांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आले. वारंवार पाठपुरावा करूनही यादव दाम्पत्याने पैसे दिले नाहीत. त्यामुळे पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. पोलिसांनी यादव दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे. अद्याप त्यांना ताब्यात घेतलेले नाही.