Sangli: व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने दहावीतील मुलीने संपविले जीवन; चार तरुणांवर गुन्हा, दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 12:01 IST2025-07-09T12:00:15+5:302025-07-09T12:01:54+5:30
प्रकरणाला वेगळे वळण

Sangli: व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने दहावीतील मुलीने संपविले जीवन; चार तरुणांवर गुन्हा, दोघांना अटक
आटपाडी : तालुक्यातील दहावीतील एका अल्पवयीन मुलीने सोमवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेला मंगळवारी वेगळे वळण मिळाले. लैंगिक शोषणाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.
याप्रकरणी राजू विठ्ठल गेंड (वय २३) आणि रामदास गायकवाड (वय २४) यांना अटक करण्यात आली आहे. अन्य दोन संशयित फरार आहेत. पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, आत्महत्या केलेली मुलगी दहावीत शिकत होती. सोमवारी ७ जुलै रोजी सकाळी तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी रात्री नऊ वाजता घरी जेवताना तिने घरातील लोकांना तिच्याबाबतीत घडलेल्या गोष्टींची कल्पना दिली.
गावातील राजू गेंड, रामदास गायकवाड, रोहित खरात आणि बनपुरी येथील अनिल काळे हे शाळेत जात असताना त्रास देत असल्याचे तसेच लैंगिक छळ केल्याची गोष्टही तिने सांगितली. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी मिळत असल्याने ती चिंतेत होती. घरच्यांनी याबाबत सकाळी योग्य निर्णय घेऊ, असे सांगून आधार दिला होता. मात्र तिने दुसऱ्या दिवशी सकाळी आत्महत्या केली.
राजू विठ्ठल गेंड, रामदास गायकवाड, रोहित सर्जेराव खरात (सर्व रा. करगणी) आणि अनिल नाना काळे (रा. बनपुरी) यांनी मृत मुलीला मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन, तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक छळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेत बेकरीचालक राजू गेंड हा मुख्य सूत्रधार आहे.
नागरिकांनी बेकरी चालक आणि त्याच्या साथीदारांवर कठोर कारवाईची मागणी करीत गाव बंद करून त्यांचा निषेध व्यक्त केला. बेकरीच्या आत एक खोली असून तिथून रॅकेट चालवले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यानिमित्ताने मंगळवारी दिवसभर ग्रामस्थांनी आटपाडी पोलिस ठाण्यात ठिय्या धरला होता. सायंकाळी उशिरा पोलिसांत पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दोघा संशयितांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
तपासात दिरंगाईची तक्रार
पोलिसांनी आरोपींविरुद्ध पोक्साेअंतर्गत गुन्हा दाखल न केल्यामुळे भाजपच्या नेत्या नीता केळकर यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात जाऊन माहिती घेतली. मात्र, पोलिस निरीक्षक विनय बहिर आणि तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक राजीव केंद्रे दोघेही गैरहजर होते. नीता केळकर यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील यांच्याशी संपर्क साधून पोलिस तपासात दिरंगाई झाल्याची तक्रार केली. याबाबत पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा नीता केळकर यांनी दिला. सायंकाळी पोलिसांनी पोक्सोअंतर्गत चौघांवर गुन्हा दाखल केला.