TET Exam: सांगली जिल्ह्यात टीईटी परीक्षेला ७४५ विद्यार्थ्यांची दांडी, कडक बंदोबस्तात झाली परीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 19:29 IST2025-11-24T19:29:20+5:302025-11-24T19:29:49+5:30
टीईटी परीक्षाचे संपूर्ण कामकाज व्हिडीओ रेकॉर्डिंग व सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली पारदर्शकपणे पार पडले

संग्रहित छाया
सांगली : जिल्ह्यामध्ये रविवारी टीईटी परीक्षा २७ केंद्रांवर कडक पोलिस बंदोबस्तात सुरळीतपणे आणि कोणताही अनुचित प्रकार न होता पार पडली. पेपर १ साठी ५ हजार ४४ विद्यार्थी नोंद झाले होते, त्यापैकी ४७२० विद्यार्थी हजर होते. तर ३२४ विद्यार्थी गैरहजर राहिले. पेपर २ साठी ७ हजार १९९ विद्यार्थी नोंद असताना प्रत्यक्षात ६७७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ४२१ विद्यार्थी गैरहजर राहिले. एकूण ७४५ विद्यार्थ्यांनी दांडी मारली.
सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणेचा वॉच होता. टीईटी परीक्षेबाबत जिल्हा संनियंत्रण कक्ष स्थापन केला होता. तसेच प्रत्येक भरारी पथकात एक महिला कर्मचाऱ्याचा समावेश केला होता. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना परीक्षेच्या कामकाजामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व परीक्षार्थी (दिव्यांग उमेदवारांच्या लेखनिकासह) यांचे मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने फिकिंग करूनच त्यांना पुढे प्रवेश देण्यात आला.
परीक्षा कामकाजात कोणतीही दिरंगाई होऊ नये, तसेच परीक्षा कालावधीत गोपनीयता आणि सुरक्षेची आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी. परीक्षा झाल्यानंतर परीक्षा साहित्य जिल्हास्तरावर काळजीपूर्वक जमा करावे, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी काकडे यांनी दिल्या होत्या. या सूचनेचे परीक्षा केंद्रांवर काटेकोरपणे पालन करण्यात आले. टीईटी परीक्षा २०२५ चे संपूर्ण कामकाज व्हिडीओ रेकॉर्डिंग व सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली पारदर्शकपणे पार पडले.
जिल्ह्यातील २७ केंद्रांवर टीईटी परीक्षा झाली. सुरळीतपणे तसेच कोणताही अनुचित प्रकार न होता पार पडली. जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा व्यवस्थितपणे पार पडली. उपसंचालक प्रभावती कोळेकर यांच्यासह शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, योजना तसेच डायट यांच्या भरारी पथकाने परीक्षा केंद्रांवर भेटी देऊन पाहणी केली. - मोहन गायकवाड, प्राथमिक शिक्षणाधिकारी