अशोक डोंबाळे
सांगली : जिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाल्याने समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. १ फेब्रुवारीच्या अहवालानुसार जिल्ह्यातील लहान-मोठ्या ८३ पाझर तलावांमध्ये ६८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या रब्बी हंगामात व पुढील उन्हाळ्याच्या दोन महिन्यांत पाण्याची चिंता नाही. कोणत्याही ठिकाणी टँकर सुरू होतील अशी परिस्थिती नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आली आहे.
जिल्ह्यामध्ये मोरना (ता. शिराळा), सिद्धेवाडी (ता. तासगाव), बसाप्पावाडी (ता. कवठेमहांकाळ), संख, दोडनाला (ता. जत) हे पाच मध्यम प्रकल्प असून, तिथे १,७६० दशलक्ष घनफूट पाणी साठ्याची क्षमता आहे. सध्या १ हजार २७९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून, ७३ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यात ७८ लघु प्रकल्प असून, ६ हजार १५ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणी साठ्याची क्षमता आहे. याठिकाणी ३ हजार ९८२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून, त्याची टक्केवारी ६६ टक्के आहे. मध्यम आणि लघु असे ८३ प्रकल्प जिल्ह्यात आहेत.
जिल्ह्यास नेहमीच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. प्रत्येक वर्षीच्या उन्हाळ्यात जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये टँकर सुरू होत असल्याचा आजवरचा अनुभव आहे. परंतु, गेल्या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये एप्रिल व मे महिन्यांत अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे या दोन महिन्यांत ग्रामीण भागात फारशी पाणी टंचाई जाणवली नाही. त्यानंतर दोन महिने पावसाने थोडीफार उघडीप दिली. मात्र, त्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला.
नेहमीच ड्राय भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यात एवढा पाऊस झाला की शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या. परिणामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र, दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील सर्वच तलाव तुडुंब भरले होते. ही एका अर्थाने समाधानकारक बाब ठरली. आता फेब्रुवारी महिना सुरु असून उन्हाळ्याच्या दोन महिन्यांत फारशी पाणी टंचाई जाणवणार नाही. तसेच हे जून अखेरपर्यंत पाणी उपलब्ध असेल.
जिल्ह्यातील पाणी साठ्याची स्थिती
तालुका / तलाव संख्या / पाणी साठ्याची टक्केवारी
तासगाव / ७ / ६८
खानापूर / ८ / ७४
कडेगाव / ७ / ६३
शिराळा / ५ / ६९
आटपाडी / १३ / ७७
जत / २७ / ६३
क. महांकाळ / ११ / ६९
मिरज / ३ / ८५
वाळवा / २ / ४७
सद्या १० टक्के जादाच पाणीसाठा
जिल्ह्यात १ फेब्रुवारी २०२५ मध्ये ८३ पाझर तलावांमध्ये ५८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. चालू वर्षी १ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्ह्यातील ८३ पाझर तलावांमध्ये ६८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत सद्या १० टक्के पाणीसाठा जास्त आहे. प्रशासन आणि नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर केल्यास आगामी दोन महिने तरी जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण होणार नाही, असे चित्र आहे.
Web Summary : Sangli district boasts 68% water storage in dams, eliminating immediate water scarcity fears. Good rainfall filled reservoirs, benefiting rabi crops and easing summer concerns. Tankers unlikely needed, ensuring water availability until June.
Web Summary : सांगली जिले में बांधों में 68% जल भंडारण है, जिससे तत्काल जल संकट की आशंका दूर हो गई है। अच्छी वर्षा से जलाशय भर गए, जिससे रबी फसलों को लाभ हुआ और गर्मी की चिंता कम हुई। जून तक पानी की उपलब्धता सुनिश्चित।